Uddhav Thackeray Maharashtra Vidhan 2024: महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीन-तीन मोठ्या पक्षांचा समावेश असलेल्या दोन आघाड्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. एक मतदारसंघ आणि तीन पक्षातील इच्छुक असे, दोन्ही आघाड्यांत चित्र आहे. त्यामुळे ज्या पक्षाला मतदारसंघ सुटण्याचा अंदाज आहे, अशा पक्षात उड्या मारताना इच्छुक दिसत आहेत. यात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे दावे राजकीय वर्तुळात बोलताना केले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूरमधून अजित पवार निवडणूक लढवणार, अशाच चर्चांनी मध्यतंरी डोकं वर काढलं होतं. पण, या मतदारसंघात आता एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहेत, असे सांगितले जात आहे.
जिल्हाप्रमुख माऊली आबा कटकेंनी पक्ष सोडल्यास हा ठाकरेंच्या शिवसेनेला स्थानिक पातळीवर धक्का असेल.
अशोक पवारांविरोधात अजित पवार उमेदवारी देण्याची चर्चा
शिरूर मतदारसंघाचे अशोक पवार हे आमदार आहेत. ते सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल असा अंदाज आहे. अजित पवारांनी आधीच अशोक पवारांना आव्हान दिलेलं होतं. त्यांनी या मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचं सांगितलं जातंय.
अशोक पवार यांच्याविरोधात माऊली आबा कटके यांना पक्षात घेऊन अजित पवार उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीवेळी शिरूर मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला होता. त्यावेळी अजित पवारांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. पण, अमोल कोल्हेंकडून आढळराव पाटलांना दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला.