मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 11:20 PM2019-03-10T23:20:54+5:302019-03-10T23:21:51+5:30
मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे.
- विजय मांडे
कर्जत : लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, लगोलग आचारसंहिताही लागू झाली. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे. मावळ मतदारसंघातून गेल्यावेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी दिली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे उमेदवारीसाठी पुढे करून चाचपणी करण्यात येत आहे.
पूर्वी रायगड लोकसभा मतदारसंघ होता. बॅ. ए. आर. अंतुले हे सातत्याने निवडून येत होते. त्या वेळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९९ मध्ये काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्यात आली होती. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाशी आघाडी केली होती.
२००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे बॅ. ए. आर. अंतुले शेतकरी कामगार पक्षाच्या विवेक पाटील यांचा पराभव करून निवडून आले. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना झाली आणि मावळ आणि रायगड मतदारसंघ निर्माण झाला. मावळमध्ये कर्जत, उरण आणि पनवेलमधील तीन विधानसभा मतदारसंघ तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. मावळ मतदारसंघाची पहिली निवडणूक आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यामध्ये झाली. त्यात बाबर यांनी बाजी मारली.
गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे शिवसेनेतून आलेल्या राहुल नार्वेकर यांच्यामध्ये लढत झाली. यात बारणे निवडून आले. त्यांनी पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला आणि उत्तम काम करून पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, तर पराभूत झालेले नार्वेकर विधानपरिषदेचे आमदार झाले.
यंदा मावळ मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. खासदार बारणे यांनी पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, दांडगा लोकसंग्रह, निधीचे नियोजन आणि अगदी तळागाळात, दुर्गम भागात जाऊन काम करण्याचे तंत्र यामुळे हा मतदारसंघ शिवसेना सहजासहजी सोडेल की नाही? हे सांगता येत नाही.
गेल्यावेळी शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवित लक्ष्मण जगताप यांनी सुमारे साडेतीन लाख मते मिळवून आपली चुणूक दाखविली होती. मात्र,यंदा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा तगडा उमेदवार दिल्यास मतदारसंघाचे चित्र बदलेल असे वाटते. त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नावे चर्चेत आली होती. खुद्द स्मिता पाटील यांनी उमेदवारी लढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पवार आणि बारणे यांच्यामधील लढत रंगतदार होईल हे नक्की.
कर्जत नगरपरिषदेमध्ये २५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून युतीने सत्ता मिळवली. माथेरान गिरीस्थान नगरपरिषदसुद्धा शिवसेनेच्या ताब्यात आह. नुकत्याच झालेल्या तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल सहा ग्रामपंचायतींचे थेट सरपंच शिवसेनेचे निवडून आले आहेत, तर उरण नगरपरिषदेवर सेनेची सत्ता आहे.