मुंबई – वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपाने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचं काम सुरु केले आहे.
वरळीतील गोमाता एसआरएमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीच्या नावाखाली बळकावला आहे. पेडणेकर यांनी एसआरए योजनेअंतर्गत गोमाता जनता सोसायटीमधील केवळ ऑफिसच नाही तर फ्लॅटही लाटला. त्यांच्या कुटुंबाच्या किश कॉर्पोरेट कंपनीने तळमजल्यावर सोसायटीच्या कार्यालयासाठी राखीव असलेली जागा लाटली, असा आरोप सोमय्या यांनी केला. किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेकडे दिलेल्या कागदपत्रात त्यांचा पत्ता आणि कॉर्पोरेट कंपनीचा पत्ताही एसआरएमधील इमारतीतला आहे. याबाबत माझ्याकडे सगळे कागदपत्रे आहेत त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.
तत्पूर्वी किरीट सोमय्या यांनी शिवसेना मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील अनाधिकृत कार्यालयाला भेट दिली. याठिकाणी जाऊन त्यांनी म्हाडाची जागा अनिल परब यांनी बळकावली आणि तिथे कार्यालय उभे केले. म्हाडाने याबाबत अनिल परब यांना नोटीस बजावली, १ वर्षापूर्वी नोटीस देऊनही अद्याप या कार्यालयावर कारवाई केली नाही असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपाकडून आक्रमकपणे शिवसेना नेत्यांचे अनाधिकृत बांधकामांची पोलखोल करण्याची मालिका उघडली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र या प्रकारावरुन शिवसेनेची मात्र कोंडी होत असल्याचं दिसून येत आहे.
कंगना राणौत प्रकरणावरुन शिवसेना बॅकफूटवर
दादर, परळमधील शिवसैनिकांच्या मनात सध्या हीच भावना आहे की अर्णब गोस्वामीनी बाळासाहेबांच्या काळात ही अशी आगपाखड केली असती तर काय झालं असतं? खळ्ळखट्याकचे दिवस गेले आता ! रणकंदन ही शिवसेनेची रणनीती होती. ती आज नाही. कंगना रणौतबद्दल शिवसेनेनं जी रणनीती आखली ती पार फसली. ‘मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला हात लावून दाखवा’, अशी धमकी तिनं दिली होती. ती तशी आलीही.
कंगना मुंबईत उतरण्याच्या काही मिनिटं आधी तिच्या कार्यालयाचं अवैध बांधकाम पाडून तिच्या येण्यावरील मीडियाचा फोकस शिवसेनेनं हटवला; पण बुलडोझर चालविल्याच्या घटनेनं कंगनाला विनाकारण सहानुभूतीही मिळाली. तिचं थोबाड फोडू म्हणणारे तिला धक्का लावू शकले नाहीत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असं म्हणणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नंतर मौनाची गोळी खाल्ली. वितंडवादासाठी विख्यात असलेल्या संजय राऊतांनाही ‘कंगनाचा विषय आता संपला’ असं जाहीर करावं लागलं. कंगना प्रकरणात शिवसेना बॅकफूटवर गेली.
कंगना २ कोटींचा दावा ठोकणार
अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्य़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढले आहे. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम २ कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे.