मुंबई – वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया याठिकाणी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या मुलाला पालिकेचे कंत्राट मिळवून दिल्याचं आरोप मनसेने केला होता. पदाचा गैरवापर करुन अशाप्रकारे टेंडर न काढता महापौरांनी हे कंत्राट दिलं होतं असं मनसेने म्हटलं होतं. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेचे आरोप फेटाळून लावले आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक प्रशांत गवस हे आहेत. माझा मुलगा या कंपनीत सहसंचालक आहे हे मी नाकारत नाही. परंतु कंपनीला महापालिकेच्या कायदा आणि नियमाप्रमाणे काम मिळाले काही लोकांनी जर आक्षेप असेल तर ते मुंबई महापालिकेकडे चौकशी करु शकतात. २०११ मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. यापूर्वीही कंपनीने मुंबई महापालिकेची छोटी-मोठी कामे केली आहेत. कोविडच्या काळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचे काम देण्यात आले असं त्यांनी सांगितले.
तसेच माझा मुलगा प्रथम देशाचा नागरिक आहे त्यामुळे त्याला स्वत:चा व्यवसाय करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो जर काही चुकीचा करत असेल तर मी त्याचा निषेध केला असता. परंतु महापालिकेच्या नियमानुसार त्याला कंत्राटाने काम मिळालं आहे. महापौरांची मुलगा म्हणून जर चुकीचे आरोप करत असाल तर त्याचा मी निषेध करते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच कंत्राट मिळाले असल्याने पोटशूळ उठण्याचे कारण काय? हे मुंबईकरांना माहिती आहे. मुंबईच्या जनतेला वस्तूस्थिती समजावी यासाठी मी स्पष्टीकरण देत असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी मनसेला नाव न घेता लगावला.
मनसेने काय आरोप केलेहोते?
वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करुन देण्यात आला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली होती. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौराच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. महापौराचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आलं असा त्यांचा आरोप होता. कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.