काँग्रेसच्या बैठकीमध्ये गोंधळ, मतभेद उफाळून नेत्यांमध्ये झाली हमरीतुमरी
By बाळकृष्ण परब | Published: January 12, 2021 05:23 PM2021-01-12T17:23:06+5:302021-01-12T17:25:23+5:30
Corngress News : बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. बिहारकाँग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास हे जबाबदारी स्वीकारल्यानंतर तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आले असताना त्यांना पक्षामधील अंतर्कलहाची जाणीव झाली. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत माजी मंत्री संजीव टोनी यांनी गोंधळ घातला.
काँग्रेसचे माजी आमदार लाल बाबू लाल यांनी माजी प्रभारी शक्ती सिंह गोहील यांच्या कामाची प्रशंसा सुरू केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संजीव प्रसाद टोनी यांनी आपल्या जागेवर उभे राहत मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते आपली खुर्ची सोडून गोंधळ घालू लागले.
त्यानंतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भक्तचरण दास यांनी त्यांना मंचावर बसवले. मात्र त्यांना बोलण्याची संधी दिल्यावर त्यांनी आपण कनिष्ठ जातीचे असल्याने काँग्रेसमध्ये जाणूनबुजून आपल्याला दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, ही आरोपबाजी सुरू असताना भक्त चरण दास हे संजीव प्रसाद टोनी यांना अशाप्रकारचे आरोप न करण्याबाबत वारंवार बजावत होते. एकावेळी हा गोंधळ एवढा वाढला की पोलीससुद्धा हॉलमध्ये आले. मात्र भक्त चरण दास यांनी त्यांना परत पाठवले. पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत अनेक नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत बैठक संपल्याची घोषणा अचानक करण्यात आली.
काँग्रेसच्या या बैठकीत संजीव टोनी आणि शकीलुज्जमा, जनार्दन शर्मा यांच्यासारख्या नेत्यांनी निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याचा आरोप उघडपणे केला. माजी विधान परिषद आमदार लाल बाबू लाल यांनी व्यवस्थेच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा गोंधळ अधिकच वाढला. तसेच त्यानंतरच्या कार्यक्रमात नेते दोन गटांत विभागलेले दिसून आले.