नवी दिल्ली – दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी झालेली विरोधी पक्षांची बैठक शरद पवारांनी बोलावलीच नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. संध्याकाळी ४ वाजता पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. तब्बल अडीच तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं राष्ट्रीय मंचाचे अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सांगितले.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन म्हणाले की, काही माध्यमांकडून भाजपाविरोधी पक्षातील राष्ट्रीय मंचाची बैठक शरद पवारांनी बोलावली होती असं सांगितलं जात आहे. परंतु हे साफ चुकीचं आहे. ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली परंतु ती शरद पवारांनी बोलावली नाही. ही बैठक राष्ट्रीय मंचाचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती असं ते म्हणाले.
त्याचसोबत शरद पवार हे मोठं राजकीय पाऊल टाकत आहेत. त्यात काँग्रेसला वगळलं जात असल्याचंही चुकीचं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. राष्ट्र मंचाच्या विचारणीचे सदस्य असलेल्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यात सर्वपक्षाचे लोक आहेत. कोणताही राजकीय भेदभाव नाही. मी काँग्रेसच्या सदस्यांनाही निमंत्रित केले होते असंही माजिद मेमन म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस नेते विवेक तन्खा, मनिष तिवारी, कपिल सिब्बल, डॉ. अभिषेक मनु सिंघवी, शत्रुघ्न सिन्हा यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी काहींनी व्यस्त कार्यक्रम असल्याने त्यांना येता आलं नाही. त्यामुळे काँग्रेस वगळून तिसरी आघाडी करण्यात येईल असा अंदाज व्यक्त करणं चुकीचं आहे असं राष्ट्रवादी नेते माजिद मेमन यांनी सांगितले.
पवार-किशोर यांच्यात दिल्लीत तीन तास बैठक
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात सोमवारी दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी बैठक होती. याआधी पवार आणि किशोर मुंबईत 'सिल्व्हर ओक'वर ११ जूनला भेटले होते. ती भेटदेखील बराच वेळ सुरू होती. या बैठकीत मिशन २०२४ वर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात होतं.
सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा
संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार असल्याचंही नवाब मलिक म्हणाले होते. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवारसाहेबांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. मंगळवारच्या बैठकीत मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असं त्यांनी सांगितले होते.