झुंझुनूं : एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) बाजुने विरोधकांसह कोणीही बोलायला तयार नाहीय. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नाहीय. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसले आहेत. यावर मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik ) यांनी मोठे विधान केले आहे. झुंझुनूंच्या एका खासगी कार्यक्रमामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या वागणुकीविरोधात उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. (Meghalaya Governor Satyapal Malik angry on Central government silent on Farmers Death in Potest. )
पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, शेतकरी आंदोलन एवढा दीर्घ काळ सुरु राहणे कोणाच्याच हिताचे नाहीय. कुत्रा मेला तरी आमच्या नेत्यांचा शोक संदेश येतो. मात्र, 250 शेतकरी या आंदोलनात मृत झाले त्यांच्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाही. माझ्या आत्म्याला हीच गोष्ट दु:ख देतेय. तोडगा निघणारच नाही असे हे प्रकरण नक्कीच नाहीय, हे आंदोलन संपू शकते, अशा शब्दांत सत्यपाल मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये हा मुद्दा बनला आहे. अशावेळी तो लवकर सोडविणे हिताचे आहे. मी घटनात्मक पदावर बसलोय. दलालाचे काम करू शकत नाही. मी फक्त शेतकरी नेते आणि सरकारच्या लोकांना सल्ला देऊ शकतो, माझे केवळ एवढेच काम आहे, असेही त्यांना सांगितले.
मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले. शेतमालाला योग्य भाव न मिळण्याचा मुद्दा आजचा नाहीय. ब्रिटिशांच्या काळात मंत्री राहिलेल्या छोटूराम आणि व्हाईसरॉय यांच्यातील एक किस्सादेखील सांगितला. दुसऱ्या महायुद्धावेळी व्हाईसरॉय मंत्री छोटूरामना भेटायला गेले आणि त्यांनी अन्नधान्याची मागणी केली. तेव्हा छोटूराम यांनी त्यांना मी तुम्हाला अन्नधान्य कितीला द्यायचे याचा दर ठरविणार असल्याचे सांगितले. यावर व्हाईसरॉय यांनी सैन्याला पाठवून शेतकऱ्यांकडून धान्य घेईन अशी धमकी छोटूरामना दिली. यावर छोटूराम यांनी व्हाईसरॉयना कड्या शब्दांत उत्तर दिले. ''एकवेळ धान्याला आग लावा, परंतू तुम्हाला कमी किंमतीत गहू देऊ नका, असे मी शेतकऱ्यांना सांगेन'' अशा शब्दांत सुनावत कमी किंमतीत धान्य देण्यास नकार दिला होता.
केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी...
शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्या देशाला वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे लष्कर आणि शेतकरी समाधानी ठेवले गेले पाहिजेत, असे सांगून मलिक यांनी शेतकऱ्यांना दुखवू नका’, असे दोन दिवसांपूर्वीच मोदी आणि शहा यांना मलिक यांनी आवाहन केले होते.