आठवणी जिंदादिल विलासराव देशमुखांच्या... !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 05:12 PM2019-08-14T17:12:54+5:302019-08-14T17:15:18+5:30
बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या विलासरावांचा आज स्मृतीदिन. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी.
पुणे : विलासराव देशमुख म्हटलं की डोळ्यासमोर एक रुबाबदार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या विलासरावांचा आज स्मृतीदिन. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी.
विलासरावांना मी पहिल्यांदा बघितलं ते १९७०साली. पुण्यात ते आय एल एस कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेत होते. त्यावेळी आम्हाला युवक काँग्रेसमध्ये चांगल्या युवकांची गरज होती. याच काळात विलासराव भेटले आणि काँग्रेसशी जोडले गेले. त्याही काळात त्यांचं ते निर्व्याज हसणं आणि नीटनेटकेपण लक्षात राहावं असं होत. त्यांना त्या काळात आम्ही बघितलं तसेच ते शेवटपर्यंत होते. कधीही दुर्मुखलेले, गबाळे त्यांना बघितले नाही. कायम साधे पण उत्तम रंगसंगती असलेले कपडे आणि चेहऱ्यावर हसू असेच विलासराव होते. त्यांना तेव्हाही कलेची आवड होती. अगदी एका दिवसात तीन सिनेमेही आम्ही बघितले होते. लॉ कॉलेजजवळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) असल्यामुळे त्यांना सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा असे मित्र होते. तेव्हापासून कला क्षेत्रातल्या मित्रांशी त्यांचे नाते होते. पण तेव्हाही आणि मुख्यमंत्री झाल्यावरपण त्यांनी कधीही कोणाला एकेरी हाक मारली नाही. व्यक्ती बरोबरीची असो किंवा लहान, अधिकारी असो किंवा साधा कार्यकर्ता पण त्यांनी कायम आदरार्थी हाक मारली. त्यांच्या एका हाकेनेच समोरचा अक्षरशः विरघळून जाई. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात दोन वर्षे वकिली करून ते लातूरला गेले. तिथे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन ते टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द घडली.
विलासराव मुख्यमंत्री झाले तरी स्वतःमधील मिश्कील स्वभाव त्यांनी जपला होता. कोणत्याही ठिकाणी त्यांची मार्मिक टिप्पणी असायची. इतकेच नव्हे तर त्यांना नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत सामान्य नागरिकांशी बोलायला आवडायचं. अगदी कितीही घाई असली तरी. फोनवर तर ते कोणालाही उपलब्ध असायचे. शब्दशः कोणालाही. एक नाशिकची पाच वर्षांची मुलगी त्यांना फोन करायची आणि ते तिच्याशी आवर्जून बोलायचे. हा सिलसिला अनेक वर्ष सुरु होता. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा होता. कोणत्या क्षणी काय करायला हवं याच नेमकं ज्ञान त्यांना होत. २६ जुलैच्या महापुरात मुंबई, रायगड, महाडची परिस्थिती त्यांनी एकहाती हाताळल्याचे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. दुसरीकडे कलेचीही साथ सोडली नाही. महाराष्ट्रात असो किंवा राज्याबाहेर पण नाट्य आणि साहित्य संमेलनाला ते हजर असत. मग आमंत्रण असो किंवा नसो. आपल्याला ते कायम हसताना दिसले तरी जवळचा कार्यकर्ता पक्षातून फुटला की त्यांनाही वाईट वाटायचं. एकांतात 'आपलं मीठ अळणी आहे का' अशी खंतही बोलून दाखवायचे. पण हे वाईट वाटणंही क्षणिक असायचे. बोलता बोलता पुन्हा विषय बदलायचे आणि नव्या उत्साहाने कामाला लागायचे.
ते आज नाही हे अजूनही मला पटत नाही. त्यांचा शेवट शेवटचा संवाद तर कधीच विसरता येणार नाही. ३१ जुलैला माझा वाढदिवस आणि त्यांचा फोन हे एक समीकरण होत. २०१२साली मात्र त्यांचा फोन नाही तर ई-मेल आला. मलाही जरा आश्चर्य वाटलं ,पण कामात असतील असं वाटलं आणि मी मनावर घेतलं नाही. साधारण त्यानंतर दोन-चार दिवसांनी त्यांचा फोन आला. मेल बघितला का विचारलं. मी हो सांगितलं पण त्यांचा आवाज काहीतरी वेगळंच सांगत होता. तब्येत बरी नव्हती असं कानावर आलं होतं पण आवाजात उत्साह नाही तर क्षीणपणा होता. मी त्यांना 'साहेब कुठे आहात' असं विचारलं पण त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यांनी उत्तर टाळण्याची ही पहिलीच वेळ होती. थोड्या वेळाने न राहवून मी वैशाली वहिनींना फोन केला तर त्यांनी आम्ही ब्रीजकँडी रुग्णालयात आहोत सांगितलं आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी लगेचच त्या दिवशी रात्री मुंबईला गेलो पण दुर्दैवाने त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने चेन्नईला नेले होते. मी चेन्नईलाही गेलो पण विलासराव भेटले नाहीतच. आम्ही परतलो ते त्यांचं पार्थिव घेऊनच. महाराष्ट्रात आलो एका हुशार, मनस्वी, माणसं जोडण्याची कला असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकला होता. आणि माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली ती कायमचीच !