मध्यमवर्ग, करदाते ही देशाची संपत्ती- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 06:12 AM2019-04-27T06:12:36+5:302019-04-27T06:13:14+5:30
मुंबईतील सभेत मोदींची काँग्रेसवर टीका
मुंबई : मध्यमवर्गीयांनो, तुमची इमानदारी, पाठिंब्यामुळे मी गरिबांसाठी काही करू शकलो. लाल किल्ल्यावर म्हणालो की, जमल्यास गॅस सबसिडी सोडा आणि करोडो मध्यमवर्गीयांनी अनुदान सोडले. ती गॅसची टाकी गरीब परिवारात पोहोचली. रक्तदान, नेत्रदान, देहदान करणाऱ्या मध्यमवर्गीयांची संख्या सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिक अनुदान सोडलेल्यांची संख्या ४० लाख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जाहीर सभेत केले.
ते म्हणाले, करदात्यांना आम्ही संसदेत अर्थसंकल्प मांडताना धन्यवाद दिले. मध्यमवर्ग अनेक दशकांपासून देशाची सेवा करत आहे. पण काँग्रेस म्हणते मध्यमवर्ग स्वार्थी आहे. हे शब्द असेच निघाले नाही. त्यांचे घोषणापत्र काढून बघा. त्यांनी मध्यमवर्गाबाबत चकार शब्द काढला नाही. एका घराण्यासाठी मध्यमवर्गावर कराचा बोजा टाकू पाहते आहे. काँग्रेस म्हणजे महागाई करवाढ भ्रष्टाचार हीच काँग्रेसी त्रिसूत्री आहे. मात्र मी मध्यमवर्गाचे विशेष आभार मानतो. कारण तुमच्या मदतीने हा चौकीदार गरिबांच्या कल्याणासाठी, पायाभूत सेवांसाठी काम करू शकला. मध्यमवर्गीय आणि करदाते हे आपल्या देशाची संपत्ती आहेत. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.
भारतमाता की जय, असे म्हणत मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ‘कसे काय मुंबई, सगळे काही ठीक आहे ना’ असा संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. माँ मुंबादेवी व संकल्प सिद्धीस नेणाºया सिद्धिविनायकाच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम, असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर प्रहार सुरू केले.
मोदी म्हणाले, मी वाराणसी येथे आज उमेदवारी अर्ज भरला. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले. मी त्यांचा आभारी आहे. लोकसभेची निवडणूक म्हणजे आपल्याला दिशा देणारी, देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. गरिबांना सशक्त करणारी निवडणूक आहे. त्यांना संधी देणारी निवडणूक आहे. मात्र आज देशात जी लाट आहे; त्या लाटेमुळे काही लोक हैराण झाले आहेत. त्यांना काहीच समजेनासे झाले आहे. कारण नवमतदार मोदींसोबत आहेत. एकविसाव्या शतकातील मतदार आपल्या स्वप्नांसोबत उभा आहे. मोदी ही त्याची अभिव्यक्ती आहे. देशातील युवक २०४७ कडे पाहत आहे. तेव्हा आपण स्वातंत्र्याचे १०० वे वर्ष साजरे करणार आहोत.
निवडणूक निकालांबाबत जी काही भाकिते वर्तविली जात आहेत, याचा उल्लेखही मोदी यांनी आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, तुम्ही कोणताही सर्व्हे पाहा. छोट्या पडद्यावरचा निकाल पाहा. निकाल काय आहे? तर भाजप पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. भाजपला निवडणुकीत सर्वाधिक मते मिळणार आहेत. जे सर्व्हे करत आहेत ते महायुतीला सर्वाधिक मते मिळतील, असे म्हणत आहेत. महायुतीच्या अधिकाधिक जागा येतील, असे म्हणत आहेत.
काँग्रेस विसर्जित करा, असे स्वत: महात्मा गांधी म्हणाले. ती काँग्रेस ४४ वरून ५० वर येईल की ४४ वरच अडखळेल अशीच चर्चा आहे. तिसºया टप्प्यानंतर भाजप एनडीए सरकार येणार हे नक्की. मग समझदारी कशात आहे? मुंबईकर हुशार आहेत, हवेचा त्यांना अंदाज येतो. मत बरबाद करणार की योग्य ठिकाणी देणार? काँग्रेसच्या इतिहासात सर्वात कमी जागा २०१४ मध्ये मिळाल्या. आणि आता २०१९ सर्वात कमी जागांवर काँग्रेस उभी आहे. टीव्ही जाहिरातीत चेहरा झळकला म्हणून मतदार मते देत नाहीत. भारतासाठी येणारी पाच वर्षे अनेक संधी घेऊन उभी आहेत, असेही मोदी म्हणाले.
पुढील पाच वर्षे देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. आपण ही संधी सोडता कामा नये. आणि काँग्रेस हे कन्फ्युजनचे दुसरे नाव झाले आहे. कारण त्यांना असे वाटते की डिजिटल जनरेशन आपल्यासोबत आहे. प्रत्यक्षात असे नाही. जग बदलत आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून काही होत नसते. सर्वात महत्ताचे म्हणजे मुंबईने आपल्याला कायमच समर्थन दिले आहे. प्रत्येकवेळी आपली साथ दिले आहे. मी आज मुंबईचे आभार मानतो आहे. कोळीबांधवांचे आभार मानतो. कारण ते मुंबईला सुरक्षित ठेवत आहेत. काळ्यापिवळ्या टॅक्सीचालकांचे आभार मानतो. कारण त्यांनी मुंबईचा वेग कायम ठेवला. मुंबईला स्वच्छ ठेवत असलेल्या कर्मचारी वर्गाला मी विसरणे शक्य नाही, असे मोदी म्हणाले.
बुलेट ट्रेन मुंबईतून धावणार
वैद्यकीय बिल कमी राहील, यासाठी आम्ही काम केले. औषधांच्या किमती कमी केल्या. याचा फायदा सर्वसामान्य कुटुंबांना झाला. डिजिटल इंडियामुळे लोकांचे पैसे वाचले आहेत. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईतून धावणार आहे. काही वर्षांत मुंबईत पावणेतीनशे किलोमीटर मेट्रो धावणार आहे.
मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. काँग्रेसच्या काळात हे हल्ले झाले. काँग्रेसने काय केले. मंत्री बदलले. प्रतिक्रिया दिल्या. मात्र पुढे काय झाले? काहीच झाले नाही. काँग्रेस केवळ हातावर हात धरून बसले. आता चौकीदारचे सरकार आले. आम्ही दिल्लीत शहीद पोलिसांचे स्मारक उभारले. मुंबईत शहीद पोलिसांचे स्मारक उभारणे गरजेचे आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळालेच पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आपण आता दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना मारणार आहोत. हल्ल्यानंतर मंत्री बदलण्याची संस्कृती आपण नष्ट केली आहे. दहशतवादी पाताळात जरी लपून बसले ना तरी त्यांना शोधून काढणार. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान