अमरावती – गेल्या काही दिवसांपासून राज्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच्या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटतच गेला.
कंगना राणौतनं मुंबईचा पीओके म्हणून उल्लेख केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिलं. मग बीएमसीनेही कंगनाच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा मारत तिचं कार्यालय तोडून टाकलं. त्यामुळे कंगना आणखी भडकली. हा वाद चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. यानंतर शिवसेनेने कंगना राणौत या विषयावर पडदा टाकला. कंगनाकडून शिवसेनेवर आता कितीही टीका झाली तरी त्याला शिवसेनेकडून उत्तर न देण्याची भूमिका पक्षाने घेतली.
त्यात आता मंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणावरुन बच्चू कडू यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एखाद्या अभिनेत्रीमागून भाजपा घाणेरडे राजकारण करत आहे हे चुकीचं आहे. कंगनाला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात बच्चू कडू यांनी कंगना आणि भाजपाला फटकारत राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्न नाही, कारण शिवसेनेचा वाघ तिथं बसलाय असं त्यांनी म्हटलं आहे.
जया बच्चन यांचा कंगनावर निशाणा
चित्रपटसृष्टीला समाजमाध्यमांतून फटकारले जात आहे, कारण सरकारचा या मनोरंजन क्षेत्राला पाठिंबा नाही, असं सांगून जया बच्चन म्हणाल्या, काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण चित्रपटसृष्टीला कलंक लावू शकत नाहीत. रवी किशन यांचे वक्तव्य हे सध्या देशाची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी या विषयावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आहे, असा आरोपही बच्चन यांनी केला.
तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या. त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.
शिवसेनेनंही जया बच्चन यांना दिला पाठिंबा
हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केलेला आहे. हॉलिवूडच्या बरोबरीने बॉलिवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत. तसे नीवर मोदी, माल्या आहेत. तसेच सिनेसृष्टीच्याबाबतीतही म्हणावे लागेल. सब घोडे बारा टके, असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा आपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणलीय. त्यातून आथा किती कलाकारांना कंठ फुटतो ते पाहू, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
भारतातील सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे, अशा दावा कुणीही करणार नाही. मात्र काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटारही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे. त्यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आणि परखड आहे. चित्रपटसृष्टीची बदनामी सुरू असताना भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसले आहेत. पडद्यावर शूर लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळवणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलुपबंद होऊन पडले आहेत, अशा परिस्थितीत जया बच्चन यांनी आवाज उठवला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा
बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट
बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं
हा महाराष्ट्र आहे अन् इथं भाषाही आपलीच पाहिजे! ‘मराठी’साठी ५५ वर्षापूर्वीच्या कायद्यात बदल होणार
कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी; केंद्र सरकारच्या निर्णयावर उदयनराजेंची नाराजी