मुंबई – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असताना आता राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केले. त्यानंतर आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.
याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, रामाचं दर्शन घेण्यासाठी आपण जगलो पाहिजे, आपण जगलो पाहिजे मग दर्शन घ्यायला जाऊ, माणूस जगला पाहिजे, कोरोनाबाबत केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. तर भूमिपूजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला जात आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली असेल, तर कोणाकोणाला निमंत्रण पाठवली जातात, त्यामुळे राजकीय सोशल डिस्टेसिंग किती पाळतात बघावं लागेल असा टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
तर उद्धव ठाकरे अयोध्येला नेहमीच जातात, मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेले, नसतानाही गेले, शिवसेना आणि अयोध्येचं नातं आहे, राजकारणासाठी आम्ही अयोध्येला कधीच गेलो नाही, राम मंदिराचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे शिवसेनेने दूर केले, ते राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्व याच भावनेने आम्ही केले, ते नातं कायम आहे असं स्पष्ट शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी भूमिका मांडली आहे.
कोरोनाची लढाई ही पांढऱ्या कपड्यातील आमचे डॉक्टर आहेत ज्यांना आम्ही देवदूत म्हणतो, ते लढतायेत, धर्मावर आणि देवावर श्रद्धा कायम असते, या देशातील लाखो डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी या सर्वांचे बलिदान कोरोनाशी लढताना झालेलं आहे, आणि ही लढाई तेच लढतील तेही देवाच्या आशीवार्दाने अशा शब्दात शरद पवारांच्या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.