नाशिक : विधान परिषदेवर बारा आमदार नियुक्तीच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले असल्याने काही तरी त्यातून चांगलेच होईल, असा आशावाद व्यक्त करतानाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बारा आमदार नियुक्तीवर होणारा विलंब पाहता, राज्यपालांवर अदृश्य प्रेशर असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे.
उच्च न्यायालयात विधान परिषदेवर बारा आमदार नियुक्त करण्यावर दाखल असलेल्या जनहित याचिका निकाली काढताना न्यायालयाने राज्यपालांना निर्देश दिले आहेत. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भुजबळ यांनी, न्यायालयाने दिलेला इशारा समजून योग्य तो निर्णय राज्यपाल घेतील, असा आशावाद व्यक्त करून राज्यपाल यावर सकारात्मक विचार करतील. ज्या अर्थी न्यायालय आदेश न देता निर्देश देत असेल तर याचा अर्थ ते समजून घेतील.
राज्यपाल हेदेखील एका राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आता ते राज्यपाल झाले आहेत व त्यांचा न्याययंत्रणेवर चांगला विश्वास आहे, असे सांगून भुजबळ यांनी राज्यपालांवर अदृश्य प्रेशर असू शकते, अशी शक्यताही वर्तविली. आता उच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे या प्रकरणात काहीतरी निश्चित हालचाल होईल, आशादायी असण्यास हरकत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.