मुंबई – ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली होती, दिलीप वळसे पाटील यांनी स्वत: ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
याबाबत दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन असं त्यांनी म्हटलं आहे.
मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपा सोडून एकनाथ खडसेराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले होते, त्यावेळी खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळा मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी शरद पवारांपासून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, त्यावेळी दिलीप वळसे पाटीलही या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यामुळे वळसे पाटलांना कोरोनाची लागण झाल्याने इतर नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.