पाटणा - सरकारी अधिकारी वर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना तुमच्या ऐकिवात असतील. कधीकधी या बाबुगिरीचा मनस्ताप मंत्र्यांनाही सहन करावा लागतो, असाच एक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील समाज कल्याणमंत्री मदन सहनी यांनी अधिकाऱ्यांच्या बाबुगिरीला वैतागून राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यांनी विभागातील अप्पर मुख्य सचिव अतुल प्रसाद यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी सांगितले की, विभागामध्ये मंत्र्यांचे कुणीही ऐकत नाही. सर्व नियम कायद्यांच्या चिंधड्या उडवल्या जातात. समाजकल्याण विभागामध्ये अनेक वर्षांपासून अनेक अधिकारी ठाण मांडून आहेत. आणि मनमानी कारभार करत आहेत. त्यांना हटवण्याचा विषय काढला तेव्हा अप्पर मुख्य सचिवांनी ऐकण्यास नकार दिला. मंत्री पुढे म्हणाले की, ही केवळ माझीच परिस्थिती नाही आहे तर बिहारमध्ये कुठल्याही मंत्र्याचे कुठला अधिकारी ऐकत नाही. जून महिन्यामध्ये एकाच ठिकाणी तीन महिने पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांची यादी अप्पर मुख्य सचिवांना दाखवली. मात्र तिच्याकडे लक्ष घालणारा कुणीही नाही आहे.
दरम्यान, समाजकल्याण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची भाषा करताना मी मागास जातीमधील असल्याने आम्हाला दबावात ठेवले जात आहे. आमचे म्हणणे कुणी ऐकत नाही, असा आरोप केला. जर मंत्र्याचेच कुणी ऐकत नसेल तर अशा परिस्थितीत मंत्री बनून राहण्याचा काय फायदा, याआधीही मला असेच गप्प करण्यात आले. पण ऐकणारा कुणी नाही. सहन करण्याचीही एक मर्यादा असते. आता राजीनाम्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही, अशा शब्दात मदन सहानी यांनी निराशा व्यक्त केली.
बिहारमध्ये विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मदन सहानी यांच्यापूर्वी भाजपाचे नेते ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू यांनीही आपल्या सरकारवर आरोप केले होते. अनेक असे लोक आहेत. जे पैसे घेऊन बदल्या करतात. त्याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.