राहुल गांधींच्या भाषेवरूनच टूलकिट त्यांचेच हे स्पष्ट, मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आरोपांना उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:21 AM2021-05-29T06:21:54+5:302021-05-29T06:22:20+5:30
Prakash Javadekar News: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले की, टूलकिट ही त्यांची निर्मिती आहे. आता वेगळ्या पुराव्यांची गरज नाही
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्या भाषेचा वापर केला त्यावरून हे स्पष्ट झाले की, टूलकिट ही त्यांची निर्मिती आहे. आता वेगळ्या पुराव्यांची गरज नाही, असे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले.
जावडेकर म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी उपदेश न देता काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांवर लक्ष द्यायला हवे. राज्ये लस उत्पादकांकडून आपला २५ टक्के कोटादेखील खरेदी करीत नाही. आतापर्यंत ज्या २० कोटी लस मात्रा दिल्या गेल्या त्या पूर्णपणे केंद्र सरकारने मोफत दिल्या आहेत.’ ‘काँग्रेसने कोव्हॅक्सिनबद्दल शंका व्यक्त केल्या; परंतु आज राहुल गांधी म्हणत आहेत की, लस हाच एकमेव उपाय आहे. याला मोदी लस म्हणून भ्रम पसरविण्याचाही प्रयत्न केला, भारतात मोठ्या प्रमाणात दोन लसी बनविल्या गेल्या. त्यातील कोव्हॅक्सिन पूर्णपणे भारताची स्वत:ची लस आहे.
लसीकरण यावर्षी पूर्ण होणार
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘डिसेंबरपर्यंत १०८ कोटी लोकांना २१६ कोटी मात्रा (डोस) दिल्या जातील. याची पूर्ण तयारी सरकारकडे तयार आहे. यात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, झाइडोस्कैडुला, नोव्हॅक्स, जेनोवा, स्पुतनिक या लसींसारख्या देशी-विदेशी लसींचा वापर केला जाईल.’