मुंबई – पुण्यातील २२ वर्षीय तरूणीच्या आत्महत्येमागे नेमकं कोण याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रविवारी हडपसरमध्ये एका मुलीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, मात्र ती आत्महत्या होती की तिला कोणी मारलं याचा तपास करावा अशी मागणी भाजपाच्या महिला आघाडीने केली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे, भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, सरकारमधील कथित महिला प्रकरणाची ताबडतोब सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी मंत्र्याची दबंगगिरी सहन केली, त्यावर चुपचाप राहिले. आता आपल्याच पक्षाच्या प्रकरणात ही दादागिरी की राठोडगिरी सहन करणार का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.(Thackrey Government Minister trouble due to girl Suicide in Pune)
तसेच या राज्यात मंत्र्यांपासूनच महिला सुरक्षित नाहीत, कोणी बलात्काराची तक्रार करतंय, कोणी आपली मुलं पळवून नेली म्हणून तक्रार करतंय, आता मंत्र्यांच्या संबंधामुळे महिला आत्महत्या करू लागल्या आहेत, आणि दबावामुळे कोणी नातेवाईक पुढे येऊन तक्रार करत नाही, इतकी राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. रक्षकच महिलांसाठी भक्षक बनले आहेत असा आरोप करत तात्काळ निनावी एफआयआर दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सत्य बाहेर यावं – फडणवीस
पुण्यातील या प्रकरणात तरूणीने आत्महत्या केली हे दुर्देव आहे, या मृत्यूमागील संपूर्ण सत्य बाहेर यावं, यातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षीय पूजा या तरुणीने इमारतीवरून उडी मारून पुण्यात आत्महत्या केली होती. तिचे मूळ गाव परळी (जि. बीड) आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली होती. तरुणीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही; परंतु संबंधित तरुणीच्या आत्महत्येवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्याबाबत अधिकृत कोणतीही तक्रार अद्याप मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितले. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित बड्या मंत्र्याचा या तरुणीसोबत असलेला संबंध पोलिसांनी शोधून काढला पाहिजे अशी भाजपाच्या महिला आघाडीने केली आहे.
ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ, असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते.