ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा शिवसेनेला धक्का; नेत्याने शिवबंधन सोडून काँग्रेसचा 'हात' धरला
By प्रविण मरगळे | Published: January 4, 2021 12:44 PM2021-01-04T12:44:11+5:302021-01-04T12:44:40+5:30
मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे.
मीरा-भाईंदर – काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता, हा वाद इतका विकोपाला गेला की, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत पक्ष सोडून गेलेल्या ५ नगरसेवकांना शिवसेनेत पुन्हा पाठवण्याची विनंती राष्ट्रवादीला केली होती, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु स्थानिक पातळीवर अद्यापही काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा हात हाती धरला आहे. काशीमिरा हायवे येथे शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांचा दबदबा होता, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत सातन यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मीरारोडच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं, त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसमधील नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत होते, परंतु राज्यात सत्तेत एकत्र असताना या पक्षांतराकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
औरंगाबाद नामांतरणावरूनही शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद
राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरूनही राजकारण पेटलं आहे. विरोधक भाजपा आणि मनसे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने औरंगाबादचं संभाजीनगर होणार का? हे पाहणं गरजेचे आहे, पण तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतरणाचे विषय आणले जाणार नाहीत, शिवसेना असा प्रस्ताव आणेल वाटत नाही, नामांतरण करून काही होणार नाही अशी भूमिका घेतल्याने काँग्रेस-शिवसेना यांच्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्धार
काँग्रेस हायकमांड फारसे उत्सुक नसतानाही केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने राज्यातील काही नेत्यांच्या आग्रहाखातर हायकमांडने महाविकास आघाडीच्या प्रयोगाला मान्यता दिली आहे. मात्र, मुंबईतील काही नेत्यांचा व मुख्यत्वे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदे न मिळालेल्या काहींचा या सरकारला विरोध आहे. त्या नेत्यांना लागलीच तोंड देणे टाळण्याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.