"शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’’, संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:18 PM2021-06-17T12:18:42+5:302021-06-17T12:20:14+5:30
Sanjay Raut News: २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते.
मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. दरम्यान, दीड वर्षांचा काळ लोटल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये कुरबुरींना सुरुवातीचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून (Congress) स्वबळाचे संकेत देण्यात आल्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. ("Miracles in the state if Shiv Sena and NCP fight together", Sanjay Raut's big statement )
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, राज्यातील काही पक्षांना स्वबळाचं अजीर्ण झालं आहे. भाजपाने स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे राज्यातील नेते नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची भाषा केलेली नाही. मात्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, शिवसेना भवनासमोर काल झालेल्या राड्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काल शिवसेना भवनावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला. शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाला दिला.