डोंबिवली : सोशल मीडियावर एखाद्याला शिवीगाळ करणे, ट्रोल करणे तसेच एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणे, असे प्रकार सध्या वाढले आहेत. हे केले जात असेल, तर सुसंस्कृत समाजासाठी तसेच देशासाठी ते चांगले नाही. त्यामुळे समाजात चुकीचे काही घडत असेल, तर माझी नैतिक जबाबदारी आहे की, मी यावर आवाज उठविला पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
सुळे यांनी रविवारी डोंबिवली येथील जोंधळे इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण आणि येणारे शैक्षणिक धोरण याबद्दल काय वाटते व टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आणि न्यूज यामध्ये पुढे कोणते धोरण असले पाहिजे, सेक्स एज्युकेशन यासह अन्य विषयांवर झूमद्वारे संवाद साधला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या, एखाद्याच्या खाजगी आयुष्यात घुसून दाखवले जाते, हे ऐकायला मला आवडत नाही. अभिनेत्रीच्या गाडीचा पाठलाग केला जातो. अगदी तिने कोणता ड्रेस घातला आहे इथपर्यंत, ते दाखवले जात आहे. टीव्हीवर दाखवले जाणारे हे मुलांना तरी आवडते का? असा सवाल सुळे यांनी केला.
मुलांकडून ड्रग्ज का घेतले जात आहे, ते थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. अफवा पसरवण्यासाठी ज्या एजन्सी किंवा वृत्तपत्रे आणि चॅनल काम करत आहेत, त्यांना जाहिरात न देण्याचा निर्णय बजाजचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनी घेतला असल्याकडेही सुळे यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. या संवादात प्रणय काते, पूनम निमजे, अर्चित पुरंदरे, निखिल बागुळ यासह अन्य अनेक विद्यार्थ्यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी सहभाग घेत आपले विचार मांडले.विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी करणार चर्चाडोंबिवलीप्रमाणे यापुढे कल्याण, अंबरनाथ येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी सुळे या संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.