मिथुन चक्रवर्ती मूळ नक्षलवादी होते, आता त्यांचा प्रभाव कमी झालाय; तृणमूल काँग्रेसच्या खासदाराची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:14 PM2021-03-08T13:14:26+5:302021-03-08T13:22:17+5:30
TMC On Mithun Chakraborty : रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आक्रमक भूमिका घेत आपण कोब्रा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
तृणमूल काँग्रेसमधून राज्यसभेवर गेलेल्या मिथुन चक्रवर्ती यांनी एका प्रकरणी नाव आल्यानंतर राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर राजकारणापासून ते दूर गेले होते. परंतु चार वर्षांच्या राजकीय सन्यासानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामागे गरीबांचं मदत करणं हे आपलं स्वप्न आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु यानंतर तृणमूल काँग्रेसकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. "लोकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासार्हता, कोणताही सन्मान आणि प्रभाव राहिलेला नाही. मिथुन चक्रवर्ती हे मूळ नक्षलवादी होते आणि यापूर्वी त्यांनी चार पक्ष बदलले आहेत," असं म्हणत तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी निशाणा साधला.
"मिथुन चक्रवर्ती आजचे स्टार नाहीत. ते यापूर्वी स्टार होते. त्यांनी आतापर्यंत चार पक्ष बदलले. ते मूळ नक्षलवादी होते. त्यानंतर ते सीपीएममध्ये गेले, त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेवर खासदार करण्यात आलं," असंही सौगत रॉय यावेळी म्हणाले. "भाजपनं अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी ईडी केसची धमकी दिली आणि त्यांनी राज्यसभा सोडली. आता ते भाजपमध्ये सामील झाले. त्यांची विश्वासार्हता, सन्मान राहिला नाही. त्यांचा लोकांमध्येही आता कोणता प्रभाव राहिला नाही," असं वृत्त एएनआयनं सौगत रॉय यांच्या हवाल्यानं दिलं आहे.
मी कोब्रा.. दंश केल्यास फोटो लागेल
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकातामध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. "मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल," असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. ते कोलकाता येथे पार पडलेल्या ब्रिगेड ग्राऊंड येथील रॅलीत उपस्थित होते.
"मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात," असंही मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. "हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे," असंते म्हणाले होते.