ठाणे : केंद्र आणि राज्य सरकाराच्या भांडणात माझ्या सारख्या आमदाराचा बळी जात असल्याचा पुनरुच्चार शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रबाबत त्यांना छेडले असता, त्याला आता भरपूर पावसाळा, वादळ, वारा होऊन गेला असल्याचे सांगत त्यांनी या पत्राबाबत माघार घेत आता माझा विचार बदलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात दहीहांडी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रबाबत छेडले असता, तो विषय आता माझ्या दृष्टीने जुना झाला आहे. त्यानंतर भरपूर पावसाळा आणि वादळ वारा देखील होऊन गेला आहे. त्यामुळे त्यावर आता बोलणे अयोग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी माझे कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या कुटुंबाची फरफट झाली आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात मी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी पुन्हा सांगितले.
त्यानुसार, या प्रक्रियेत मला संरक्षण देखील मिळाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या परिस्थिती बाबत त्यांना छेडले असता, यापूर्वी महाराष्ट्र हे संस्कृती प्रिय असे राज्य होते. परंतु मागील दीड ते दोन वर्षात त्यात खुप बदल झाला आहे, त्यामुळे तरुण पिढी देखील आता राजकारणात यायचे की नाही, याबाबत विचार करतांना दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची पुन्ही ती संस्कृती टिकविण्यासाठी किंबहुना ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत जे वक्यव्य केले त्याबाबत सरनाईक यांना छेडले असता, मी एक लहान आमदार असून मी छोटा कार्यकर्ता त्यामुळे त्यावर मला बोलता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या भुमिकेबाबत नाराज आहात का? यावर त्यांना विचारले असता, मी शिवसेनेबाबत नाराज नसल्याचे त्यांनी सांगत, तसे असते तर माझ्या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आले असते का? असा उलट सवाल त्यांनी केला आहे.