Sanjay Gaikwad Nana Patole : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाने वादंग निर्माण झाले. आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांकडून महायुतीला लक्ष्य केले जात आहे. गायकवाडांच्या विधानावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना घेरले.
"राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देणार", असे विधान शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्याबद्दल नाना पटोलेंनी संताप व्यक्त केला.
नाना पटोले म्हणाले, "शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा... ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसे गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे."
पटोलेंची मोदी-शाहांवर टीका
"पहिले भाजपाचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो. दुसरा भाजपाचा नेता आणि मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतात. यावर नरेंद्र मोदी, अमित शाह मूग गिळून गप्प असतात", अशी टीका नाना पटोले यांनी केली.
कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? शिंदे-फडणवीसांना सवाल
नाना पटोले पुढे म्हणाले, "आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातला गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीच पाहिजे. या राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाही मानता की नाही?", असा सवाल पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केला.
"संविधानावर बोलायची तुमची लायकी आहे का?"
"संजय गायकवाड यांच्या तोंडाला आवर घाला नाहीतर, पंजा काय करेल हे कळणारही नाही. आधी तुमची लायकी आहे का संविधान आणि राहुल गांधींवर बोलायची? हे एकदा पाहा. सत्तेच्या माजात काहीही बरळू नका. नाहीतर निवडणुकीत घरचा रस्ता पक्का समजा... जनता यांना धडा शिकवणारच. मतदार घरचा रस्ता दाखवणारच", असा इशारा नाना पटोलेंनी दिला.