पुणे: महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पुण्यात आहेत. शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यानं मनसे आणि भाजपचं सूत जुळणार का, याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं. याबद्दल राज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली.
परप्रांतीयांबद्दलची भूमिका मनसे आणि भाजपमधील युतीत अडथळा ठरत असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल राज आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीत चर्चा झाली. त्यावर राज यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. 'चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर मी याबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करणारी एक लिंक पाठवेन, असं त्यांना सांगितलं होतं. मात्र अद्याप तरी मी त्यांना क्लिप पाठवलेली नाही. तुम्ही त्या क्लिपवरून सूत जुळवू नका,' असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर माझ्या भूमिका स्पष्टच आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं. परप्रांतीयांनी भूमिपुत्रांवर अतिक्रमण करू नये आणि स्थानिकांनी परप्रांतीयांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे निर्णय पटले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. जे मला पटलं नाही, त्यावर मी टीका केली. स्पष्ट बोलण्यात चुकीचं काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारनं लागू केलेल्या लॉकडाऊनवरही राज यांनी भाष्य केलं. 'लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होतात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू देण्यास हरकत नाही. कारण लोकलशिवाय अनेकांना ऑफिसला जाता येत नाही. सरकारनं सतत लॉकडाऊन वाढवत न्यायचा आणि आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत, असं होऊ शकत नाही. पत्रकार पी. साईनाथ यांचं 'दुष्काळ आवडे सर्वांना' नावाचं पुस्तक आहे. तसं 'लॉकडाऊन आवडे सरकारला' अशी अवस्था आता झाली आहे', अशी टीका राज यांनी केली.