Raj Thackeray Breaking News: विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा रविवारी (१३ ऑक्टोबर) पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचा समाचार घेतला. ठाकरे आणि शिंदेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणांवरही राज ठाकरेंनी भाष्य केले. शिंदेंची पुप्षा म्हणत खिल्ली उडवली, तर उद्धव ठाकरेंनाही वाघनखांवरून डिवचलं.
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नक्कल करत खिल्ली उडवली.
राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलले?
ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत १२ ऑक्टोबर रोजी पार पडला. याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "काल झालीये सगळी भाषणं. ते उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही. सारखं वाघनखं काढतंय (नक्कल करत). इथून अब्दाली आला. तिथून अफजल खान आला. तिथून शाहिस्ते खान आला", असे खोचक टोले लगावत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले, "अरे महाराष्ट्राबद्दल बोल."
एकनाथ शिंदेंना म्हणाले, पुष्पा
एकनाथ शिंदेंवरही राज ठाकरेंनी नक्कल करत टीका केली. एकनाथ शिंदेंचा पुष्पा असा उल्लेख करत राज ठाकरेंनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, "ते एक पुष्पा वेगळंच चालुये, एकनाथ शिंदे. मै आयेगा", असं म्हणत त्यांनी दाढीवरून हात फिरवत शिंदेंना डिवचलं.
राज ठाकरेंनी पक्षांतरं करणाऱ्या नेत्यांना सुनावलं
"मी असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही. कुणामुळे निवडून आलात? कुणी तुम्हाला मतदान केलं? कशासाठी तुम्हाला मतदान केलं? सध्या आता तुम्ही काय करता? मला कळेचना हे काय चालुये. आता राष्ट्रवादीमध्ये आहे, पण तो उबाठाकडे तिकीट मागतोय, कदाचित तुतारीकडे जाईल, किंवा तुतारीकडून आपल्याकडे पण येऊ शकतो. मला कळत नाही, यांचे घरचे तरी कशी साथ देतात. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांवर आपण काय संस्कार करत आहोत?", असा सवाल त्यांनी पक्षांतरं करणाऱ्या आमदार-खासदार आणि नेत्यांना केला.