पुणे : ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरणही तापले असताना आशिष शेलार आणि मनसेमध्ये ट्विटरवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगलेले बघायला मिळत आहे. शेलार यांनी डिवचण्यासाठी केलेले ट्विट मनसेला चांगलेच झोंबले असून त्यांनी 'काळजी करू नका शेलार भाऊ' म्हणत त्यांना हुकलेल्या मंत्रिपदाचीही आठवण करून दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसतानाही मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचण्याचं काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना बारामतीहून स्क्रिप्ट येते अशी टीका केली होती, हा धागा पकडत आशिष शेलारांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर मनसे माघार न घेता शेलार यांच्यासाठी खास मिरची लागेल असे उत्तर दिले आहे.
या ट्विटमध्ये शेलार म्हणाले की, “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले
म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..
पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन..
बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!”,
एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे” असा टोलाही शेलारांनी लगावला होता.
त्यावर मनसेने मोदीमित्रांची चैन झाली भारतीयांच्या कष्टावर...
चेंडूफळीचा खेळ तुमचा, बारामतीच्या उष्ट्यावर...
त्रिफळा उडवू मोदी-शहांचा, गोलाकार खेळाडू तुमचे थकतील...
काळजी करू नका शेलार भाऊ,
बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील...
#हुकलेलंमंत्रिपद अशा शब्दात टीका केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा चेंडू आता शेलार कसे परतवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.