मुंबई : सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजपा आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळते. तसेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपा नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यातच मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा ही चर्चाच असावी, असे म्हणत राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
शनिवारी प्रवीण दरेकर यांनी वृत्तवाहिनी 'टीव्ही 9 मराठी'शी संवाद साधला. यावेळी मनसे आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. "राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात. राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केले आहे. मात्र, या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील", असे प्रवीण दरेकर म्हणाले.
याचबरोबर, मुंबईतील कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी परिसरातील घरांवर शनिवारी सकाळी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना याला विरोध केला. या कारवाईविरोधात भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. कुरारमध्ये झोपडपट्टीवासियांवर करण्यात आलेल्या कारवाईचा प्रवीण दरेकर यांनी निषेध नोंदवला. आमचा विकास कामांना विरोध नाही. पण पावसात जुल्मी पद्धतीने कारवाई करणे योग्य नाही. जुल्मी कारभाराची पद्धत अयोग्य आहे. लोकशाहीत लोकांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पुनर्वसन करणे ही छोटी गोष्ट आहे. पण समन्वयाच्या अभावामुळे हे घडत नाही, असे असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपा आणि मनसे युतीसंदर्भात खुद्द भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी भाष्य केले आहे. "राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही," असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असेही ते म्हणाले.
याशिवाय, "आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो, तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनकल्यानासाठी आंदोलने करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळे सरकार चालते, वेगळ्या विचारांच सरकार चालते. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असे वाटत नाही," शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात चंद्रकात पाटील यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी नव्हे, अन्यायाविरोधात आक्रमक - पाटील ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात भाष्य करताना पाटील म्हणाले, "ईडी ही एक केंद्रिय स्वायत्त संस्था आहे. यामुळे त्यावर काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी नव्हे, तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत. राठोड प्रकरण आणि कारखान्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आक्रमक आहोत. आम्ही महाविकास आघाडीतील कुण्याही एका ठराविक पक्षाविरोधात नाही."