मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास शरद पवारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरुन मनसेने आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (mns leader sandeep deshpande criticizes thackeray government)
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. संदीप देशपांडे हे सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसतात. यावेळी, "कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी नाही तर सरकार वाचवण्यासाठी होममध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे, अशी चर्चा आहे. कितपत खरे ते त्या देवालाच ठाऊक", असे खोचक ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
दरम्यान, पित्ताशयाचे ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी तब्बल महिन्याभरानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शरद पवारांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना मदत, कोरोनाचे संकट, म्युकरमायक्रोसिसचे संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. तसेच, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न)
शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीत राजकीय चर्चा नाही; संजय राऊतांचा दावाशरद पवार-उद्धव ठाकरे भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांना संजय राऊत म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेऊ नका, अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीत असं काही झाले नाही. मराठा आरक्षणासह अनेक विषय आहेत. कोरोना, लसीकरण यावर चर्चा होऊ शकत नाही का? राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का? शरद पवारांचा सरकारला मनापासून आशीर्वाद आहे. हे सरकार ५ वर्ष पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकशरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर गुरुवारी सकाळपासून शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांची लगबग पाहायला मिळत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बंगल्यावर असून थोड्याच वेळात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर प्रमुख नेते पोहचतील असं सांगण्यात आले आहे.
अजित पवार आणि नितीन राऊत यांच्या खडाजंगीपदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मागील बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याचे समजतं. उपसमितीला न विचारताच हा ७ मे रोजीचा हा जीआर कसा रद्द करण्यात आला, सामान्य प्रशासन विभागाने परस्पर निर्णय कसा घेतला, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. त्यावेळी, मागासवर्गीयांवर अन्याय करण्याची माझीही भूमिका नाही, असे पवार यांनी राऊत यांना सुनावल्याचे समजते. राऊत आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी केली. त्यावर, हा सर्व विषय विधि व न्याय विभागाकडे पाठवून अभिप्राय मागवायचा व नंतर पुन्हा उपसमितीची बैठक घ्यायची, असा निर्णय झाला होता.