मुंबईराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संदर्भात रविवारी जनतेला फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संबोधित केलं. मुख्यमंत्र्याच्या या भाषणावर मनसेने जोरदार टीका केली आहे.
'मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी', असं ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या संबोधनात कोरोनाची दुसरी लाट, कार्तिकी वारी आणि पोस्ट कोविडच्या परिणाम यांसह विविध विषयांवर आपलं मत मांडलं. याशिवाय, कोरोना काळ अजून संपलेला नाही याची जाणीव करुन देत 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य सरकारच्या उपक्रमाचीही आठवण करुन दिली. हाच धागा पकडून संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.
आपला मुख्यमंत्री आपले दुर्दैव असून ती आता आपलीच जबाबदारी असल्याचं सांगत देशपांडे यांनी घणाघात केला आहे. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मनेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण अजूनही वाढीव वीजबिलाचा मुद्दा ऐरणीवर आहे, असंही काल संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं होतं. 'कोरोनाच्या विषयावर मला कोणतंही राजकारण करायचं नाही. पण काही लोकांचं हे उघडा ते उघडा असं सुरू आहे. मी सर्व काही सुरू करायला तयार आहे. काही झालं तर त्याची जबाबदारी घेता का?', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. राज्य सरकार म्हणून जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढी जबाबदारी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.