मुंबई : राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे. (MNS Sandeep Deshpande Tweet on corona situation)
"लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातले नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळेच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही," असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.
"केंद्र, राज्यांनी लॉकडाऊनचा विचार करावा"देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, कोरोना रुग्णांची एकूण संख्या दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
(कोरोनातून बरे झाल्यानंतर 'या' टेस्ट करणे महत्वाचे, दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतील)
मुंबईसह १२ जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेखकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटनांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती... राज्यात सोमवारी (काल) नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास १० हजारांनी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात काल दिवसभरात ५९ हजार ५०० कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ४८ हजार ६२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.