मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु मागील काही दिवसांत राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. मंदिरे सुरु करण्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं, या पत्रातून शिवसेनेला हिंदुत्वाची जाणीव करून दिली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला होता.
राज ठाकरे लोकांच्या प्रश्नासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. लॉकडाऊन काळात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांनी कृष्णकुंज गाठलं होतं, यात मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरचे पुजारी, ज्येष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अनेक लोकांनी राज ठाकरेंकडे मदतीसाठी विनवणी केली होती. वेळोवेळी राज ठाकरेंनी या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.
ग्रंथालय सुरु करण्याबाबत राज ठाकरेंनी थेट संबंधित खात्याच्या मंत्र्यांना फोन करून प्रश्न मार्गी लावला होता. लॉकडाऊन काळात जीम चालक आणि व्यावसायिक यांनी राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर राज ठाकरेंनी जीम सुरु करा, पुढचं मी बघतो असं विधान केले होते. त्यानंतर राज्यभरातील जीम हळूहळू सुरु करण्यात आल्या होत्या. राज्यातील मंदिरे सुरु करण्याबाबतही राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतला होता. आता राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत.
राज्यपालांच्या पत्रात नेमकं काय?
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे राज्यात बार, रेस्टोरंट आणि समुद्र किनारे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे देव-देवता मात्र लॉकडाऊनमध्ये अडकून पडले आहेत. मागच्या तीन महिन्यात विविध शिष्टमंडळांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली. यात धार्मिक नेते, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे.
दिल्लीत ८ जूनला मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला. त्याच सुमारास देशभरात मंदिरे उघडली गेली. मात्र, त्यामुळे कुठे कोरोनाची लाट आल्याचे चित्र नाही. त्यामुळे आवश्यक काळजी घेत सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केलं होतं. तुम्ही कट्टर हिंदुत्त्ववादी आहात. प्रभू श्रीरामांप्रती तुमची श्रद्धा तुम्ही जाहीरपूर्वक दाखवली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शनही घेतलं होतं. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरालाही तुम्ही भेट दिली होती. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की ज्या 'सेक्युलर' शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो 'सेक्युलर' शब्द तुम्ही स्वीकारला आहे, असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता.
राज्यपालांविरोधात शरद पवारांची नाराजी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती. आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला गेला आहे. ज्याचा अर्थ सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि त्यांचे रक्षण होते, असा होतो. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीने संविधानामधील अशा आचारांनुसार वागले पाहिजे, असं शरद पवार म्हणाले होते.