कल्याण : राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या गळतीचा चांगलाच धसका घेतला आहे. गळतीनंतर कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा केली आहे. तसेच पक्षाला एकामागोमाग बसणारे धक्के, तसेच गळती रोखण्यासाठी नितीन सरदेसाई, अविनाश जाधव आणि शिरीष सावंत या नेत्यांकडे केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘प्रभारी’ म्हणून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.मनसेलाही याआधी २०१४ ची लाेकसभा आणि २०१५ च्या केडीएमसी निवडणुकांतही असे धक्के बसले हाेते. आता मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी मनसेला रामराम केला आहे. त्यांच्यावर साेशल मीडियावरून टीकेची झाेड उठली आहे. त्यांच्या पक्षबदलाबाबत राजकीय तज्ज्ञ तर्कवितर्क लढवत आहेत. तसेच मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह लावले जात आहे. निवडणुकीत फटकापक्ष स्थापनेनंतर २०१० मध्ये केडीएमसीच्या निवडणुकीत तब्बल २८ नगरसेवक निवडून आलेल्या मनसेचे २०१५ निवडणुकीत मात्र नऊ नगरसेवक निवडून आले हाेते. पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसलेले हे धक्के लक्षात घेता ‘डॅमेज कंट्रोल’-साठी प्रयत्न केले जात आहेत.
राज ठाकरे इन ऍक्शन मोड; कल्याणची जबाबदारी तीन खास शिलेदारांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 1:47 AM