मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे जाहीर आभार मानले आहेत. डोंबिवलीमध्येप्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्यानंतर राजू पाटील यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. राजू पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "डोंबिवलीतप्रदूषण करणाऱ्या कंपनीवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नियंत्रण बोर्ड व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. यापुढे पण प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध अशीच त्वरित व कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा" असं पाटील यांनी म्हटलं आहे.
डोंबिवली पूर्व परिसरातील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह हिरवा झाला होता. हा हिरवा प्रवाह पाहून नागरिकांना लगेच कळाले की हा पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नसून प्रदूषित पाण्याचा प्रवाह आहे. या हिरव्या नाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या प्रकरणाची कल्याण डोंबिवली आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी या प्रकरणी एमआयडीकडे संपर्क साधला असता एमआयडीसीने या प्रकरणी रायबो फाम या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी सूचना आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. यानंतर आता कारवाई करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांनी देखील संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने केमिकेलचे पाणी नाल्यात सोडण्याचा प्रकार थांबल्यानंतर नाल्यातील पाण्यात झालेल्या बदलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. "डोंबिवली गांधी नगर नाल्यात संभाव्य घातक सांडपाण्याची बातमी पाहताच एमपीसीबीने सदर कंपनीवर त्वरित कडक कार्यवाही केली आहे. महाराष्ट्राची पावन भूमी आम्ही प्रदूषित होऊ देणार नाही आणि प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली जातील" असं आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे नाल्याचा प्रवाह झाला हिरवा
डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न भर पावसात पुन्हा चर्चेत आला होता. डोंबिवलीतील एका कंपनीने मुसळधार पावसाचा फायदा घेत चक्क नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा झाला. गांधीनगर परिसरात राहणारे नागरीक शशीकांत कोकाटे यांनी सांगितले की, रासायनिक कंपन्या रासायनिक पाणी साठवून ठेवतात. भर पावसात ते नाल्यात सोडण्याचा प्रताप करतात. हा नागरीकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. या घटनेची दखल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घेतली होती. त्यांनी या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करुन जीवघेण्या प्रदूषणापासून डोंबिवलीतील नागरिकांची सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला होता.