मुंबई – कोविड काळात कुणीही राजकारण करु नका असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असताना मात्र राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून(Shivsena) सुरु आहे असा घणाघाती आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे. कोविड सेंटरच्या नावाखाली शिवसेनेकडून भ्रष्टाचार सुरु आहे याचा जाब मनसे विचारणार असं त्यांनी सांगितले आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करुन देण्यात आला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौराच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. महापौराचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आलं असे ते म्हणाले.
कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, कोरोना काळात राजकारण करु नका पण भ्रष्टाचार करा असं कामकाज करणार असाल तर मनसे गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उचलणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनीही हा मुद्दा सभागृहात उचलून धरावा असं आवाहन मनसेने केले आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी हेदेखील उपस्थित होते.