मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढत असताना महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी 'रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल' असं म्हटलं आहे. देशपांडे यांनी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच 'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा थेट सवालही सरकारला केला आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बसमधील गर्दी पाहायला मिळत आहे.
'उद्धव ठाकरे फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त'
काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी 'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर वचक नाही. सध्या उद्धव ठाकरे फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये कोणता अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्याची त्यांना हव्या असणाऱ्या विभागात बदली करून घेणे यामध्ये ठाकरे व्यस्त आहेत' अशी टीका केली होती. 'महाराष्ट्र सरकाने कोरोनाच्या काळात ओरबाडण्याचं काम केलं आहे. पत्रकार पांडुरंग रायकर हे एक उदाहरण आहेत. अशा पद्दतीची अनेक उदाहरण सध्या राज्यात पाहिला मिळत आहेत. यामध्ये अँब्युलन्स मिळाली नाही, रूग्णालयात बेड नाही मिळाला. प्रत्यक्षात रुग्णांना उपचार मिळालेले नाही. सरकाने फक्त कोरोनाच्या नावावर पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचं उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांआधीच उद्घाटन केलं. मात्र त्याचा उपयोग काहीच नाही. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत' असा टोला देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला होता.
"गंभीर आजाराच्या रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या", अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी एक पत्र पाठवलं आहे. "गेल्या सहा महिन्यांच्या कोरोना लॉकडाउनच्या कालावधीत क्षयरोग, कर्करोग, यकृत, मूत्रपिंड, मेंदूविकार, अर्धांगवायू, मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशातच या आजारांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात असतो. सध्या रुग्णांना उपचाराबरोबरच प्रवास खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. असे अनेक आजार आहेत ज्यांच्या उपचारासाठी रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा प्रवास करावा लागतो."
"सध्याची बिघडलेली आर्थिक परिस्थिती पाहता बहुतांश रुग्णांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. या खर्चामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना त्याच्या उपचारादरम्यान आधारासाठी सोबत नातेवाईकांची गरज असते. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना उपचारादरम्यान खासगी वाहनाने प्रवास परवडणं शक्य नसल्याने त्यांना रेल्वेने प्रवासासाठी मुभा देणे गरजेचे आहे. गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी दिली जावी, या मनसेच्या आग्रही मागणीचा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीने विचार करावा" असं पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...
ये दोस्ती हम नही छोडेंगे! 12 वर्षांनंतर जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक एकत्र