मुंबई - राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या अनुषंगाने मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "#Unlock5 सुरू होणार आहे मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं???????" असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. याआधी काही दिवसांपूर्वी देशपांडे यांनी सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू करा या मागणीसाठी सविनय कायदेभंग केला होता.
Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल
'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा थेट सवालही त्यांनी सरकारला केला होता. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बसमधील गर्दी पाहायला मिळली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली. अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिक ही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यावरून संदीप देशपांडे यांनी आता ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
ठाकरे सरकारची रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी
मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनाचे संकट मोठे असून, या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
'उद्धव ठाकरे फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त'
काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी 'राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासनावर वचक नाही. सध्या उद्धव ठाकरे फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये कोणता अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्याची त्यांना हव्या असणाऱ्या विभागात बदली करून घेणे यामध्ये ठाकरे व्यस्त आहेत' अशी टीका केली होती. 'महाराष्ट्र सरकाने कोरोनाच्या काळात ओरबाडण्याचं काम केलं आहे. पत्रकार पांडुरंग रायकर हे एक उदाहरण आहेत. अशा पद्दतीची अनेक उदाहरण सध्या राज्यात पाहिला मिळत आहेत. यामध्ये अँब्युलन्स मिळाली नाही, रूग्णालयात बेड नाही मिळाला. प्रत्यक्षात रुग्णांना उपचार मिळालेले नाही. सरकाने फक्त कोरोनाच्या नावावर पैसे ओरबाडण्याचं काम केलं आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच पुण्यातील जंबो कोरोना सेंटरचं उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांआधीच उद्घाटन केलं. मात्र त्याचा उपयोग काहीच नाही. हे सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत' असा टोला देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला होता.