आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेतंर्गत ही रक्कम मुख्यमंत्र्यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. २२ एकरात पसरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे आणि शिवसेनेचे ऐतिहासिक नातं आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने आता याकामासाठी निविदा मागवली आहे. त्यामध्ये विद्युत दिवे, पथदिवे, रोषणाई, पुतळ्यावरील स्पॉट लाईट्स आणि इतर शुशोभिकरणाची कामं केली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.
“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प चोरला आहे. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे.