मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडत आहे, दादर येथील महापौर निवासस्थानी ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र कार्यक्रमापूर्वीच यावरून वादंग निर्माण झालं आहे.(MNS Target Shivsena & CM Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray memorial lands worship)
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेनेही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. संदीप देशपांडे म्हणतात की, स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय.
गेल्या अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं होतं, या स्मारकासाठी मुंबईच्या महापौराचं निवासस्थान ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र याठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात, स्मारक अद्याप झालं नाही, शिवसेनेची सत्ता येऊनही काम रखडलं आहे, शिवसेनेला महापौर बंगला बळकवायचा होता अशी टीका सातत्याने मनसेकडून केली जात होती, त्यानंतर आता या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे.
दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!
या स्मारकाबद्दल सुभाष देसाईंनी सांगितलं की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याची माहिती देसाईंनी दिली आहे.