मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कंबर कसली असली तरी पक्षात नेते विरुद्ध दुसरी फळी यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. गेल्या वर्षभरात मनसेचा चेहरा जनमानसात टिकवून ठेवण्याचे काम दुसऱ्या फळीने केले असल्याने मंगळवारी होणा-या पक्षाच्या बैठकीत या संघर्षाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर हे गेल्या वर्षभरात फारसे सक्रिय नाहीत. कोरोनामुळे काही नेते तर सहा महिने घराबाहेर पडले नाहीत. मध्यंतरी ईडी चौकशीचा ससेमिरा काही मनसे नेत्यांच्या मागे लागल्याने अनेक नेत्यांनी भूमिगत होणे पसंत केले. मात्र त्याचवेळी संदीप देशपांडे, अखिल चित्रे, गजानन काळे अशा काही दुस-या फळीच्या मंडळींनी मनसे स्टाईलने व तरुणांचे लक्ष वेधणारी आंदोलने करुन पक्षाची पताका फडकत ठेवली आहे.कोरोना काळात रेल्वे प्रवास बंद झाला. तो सुरु करण्याकरिता आंदोलन करण्याचा निर्णय संदीप देशपांडे यांनी घेतला. आपण स्वत: रेल्वे प्रवास करुन बंदी मोडणार असल्याचे देशपांडे यांनी जाहीर केल्यावर पक्षातील काही नेत्यांनी त्या विरोधात नाक मुरडले. या आंदोलनापासून चार हात दूर राहण्याचा सल्ला राज ठाकरे यांना दिला. प्रत्यक्षात देशपांडे यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला. मीडियानेही हे आंदोलन उचलून धरले. काही प्रमाणात सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली गेली. त्यामुळे मनसे नेत्यांचा नाईलाज झाला. मनसेला हे आपलेच आंदोलन असल्याचे जाहीर करावे लागले.अगदी अलीकडेच अखिल चित्रे या तरुण कार्यकर्त्याने अॅमेझॉन कंपनीविरुद्ध मराठीच्या सक्तीकरिता आंदोलन केले. त्यावेळीही मनसे नेत्यांनी चित्रे यांना फोन करुन चार शब्द सुनावले. महापालिका निवडणुकीत मनसे भाजप युती होण्यात तुमच्या आंदोलनामुळे आडकाठी येऊ शकते. अॅमेझॉन कंपनी या आंदोलनास धूप घालणार नाही, असा या नेत्यांचा समज होता. प्रत्यक्षात अॅमेझॉननी मराठीचा वापर करुन या नेत्यांना तोंडघशी पाडले व चित्रे यांचे आंदोलनाला मीडिया व सोशल मीडियात तुफान प्रतिसाद लाभला.नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी असताना मनसेचे स्थानिक नेते गजानन काळे यांनी पक्षाचे आ. राजू पाटील यांच्याशी सल्लामसलत करुन त्या विमानतळाला शेकापचे ज्येष्ठ नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. आगरी मतांची मनसेकरिता बेगमी करणे हा त्या मागील हेतू होता. काळे यांनी तसे टिष्ट्वट करताच मनसे नेत्यांनी फोन करुन काळे यांची कानउघाडणी केली.वसई-विरार येथे मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतरही पक्षाच्या एकाही नेत्याने त्या कार्यकर्त्यांची पाठराखण केलेली नाही. संदीप देशपांडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांची भेट घेऊन संबंधित पोलीस अधिका-यावर कारवाईची मागणी केली. खुद्द दाते यांनीही मनसे कार्यकर्त्यांना झालेली मारहाण चुकीची असल्याचे कबुल केले व कारवाईचे आश्वासन दिले.या व अशा अनेक घटनांमुळे पक्षात नेते व दुस-या फळीतील मंडळी यांच्यात सुप्त संघर्ष सुरु असून त्याचे पडसाद उद्याच्या बैठकीत उमटण्याची चर्चा आहे. महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने राज ठाकरे या संघर्षावर कशी मात करणार, याकडे लक्ष लागले आहे.
मनसेमध्ये नेत्यांवर दुसरी फळी शिरजोर, मंगळवारच्या बैठकीत उमटणार पडसाद; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 6:53 PM
MNS News : गेल्या वर्षभरात मनसेचा चेहरा जनमानसात टिकवून ठेवण्याचे काम दुसऱ्या फळीने केले असल्याने मंगळवारी होणा-या पक्षाच्या बैठकीत या संघर्षाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
ठळक मुद्देमनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर हे गेल्या वर्षभरात फारसे सक्रिय नाहीतकोरोनामुळे काही नेते तर सहा महिने घराबाहेर पडले नाहीतत्याचवेळी संदीप देशपांडे, अखिल चित्रे, गजानन काळे अशा काही दुस-या फळीच्या मंडळींनी मनसे स्टाईलने व तरुणांचे लक्ष वेधणारी आंदोलने करुन पक्षाची पताका फडकत ठेवली