ठाणे – मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका या प्रकरणावरुन ठाण्यात शिवसेनाविरुद्धमनसे असा वाद रंगला आहे. ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांनाही एक दिवस अशाचप्रकारे घरातून उचलून नेऊ या अविनाश जाधव यांच्या विधानावरुन शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मनसेला थेट आव्हान दिलं. आम्ही पदावर असलो तरी शिवसेनेत आमचं एक पद आहे ते शिवसैनिक..त्यामुळे आमच्या नादी लागू नका असं राजन विचारे म्हटले होते. त्यावर अविनाश जाधव यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
याबाबत अविनाश जाधव म्हणाले की, मी बाळासाहेबांच्या प्रत्येक शिवसैनिकांचा आदर करतो, कोणत्या शिवसैनिकाला उचलणं हा माझा धंदा नाही. आम्ही सगळे बाळासाहेबांच्या मुशीतले आहोत, आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे. त्यामुळे शिवसैनिकांबद्दल मनात प्रचंड नितांत आदर आहे. मी म्हटलं होतं जे आम्हाला त्रास देतात ते..तुम्ही आम्हाला त्रास देतायेत का असा अर्थ होतो. माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल ते का नाही बोलले? असा सवाल त्यांनी केला.
तसेच जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्रास देणाऱ्यांना असेच उचलून नेऊ हे विधान होते, कोणाला उचलून न्यायचं की नाही न्यायचं तर तो शिवसैनिक आहे. मला शिवसैनिकांचा नितांत आदर आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ. आज अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत जे राजसाहेबांचा आदर करतात. शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खासदार राजन विचारेंना दिला आहे.
दरम्यान, एरवी एकमेकांचं तोंडही न बघणारे ठाण्यातील शिवसेनेचे खासदार, आमदार, नामदार असे सगळे मनसेच्या अविनाश जाधव यांच्या विरोधात एकत्र आले आहेत. कोविडविरोधातील उपाययोजना आखताना आणि अंमलबजावणी करताना या शिवसेना नेत्यांनी अशीच एकजूट दाखवली असती, तर कदाचित सर्वसामान्य नागरिक (वाढीव वीज बिल), करोनाबाधित रुग्ण (वैद्यकीय सुविधांचा अभाव), नर्सेस (कंत्राटी नोकरी) आणि कोकणातील चाकरमानी (एसटी) यांच्यासाठी मनसेला आक्रमक आंदोलनं करण्याची- उपक्रम आखण्याची गरजच भासली नसती. जाधव यांना शब्दांत पकडण्यापेक्षा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या धोरण आखणी आणि अंमलबजावणीतील चुका शतपटीने गंभीर आहेत, हे लक्षात ठेवा. ठाणे जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या सर्वाधिक का आणि कशी झाली, याचं आधी उत्तर द्या असा टोला मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी खासदार राजन विचारेंना लगावला आहे.
काय म्हणाले होते राजन विचारे?
एका रात्रीत आणि केवळ व्हिडओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, प्रत्येक जण कतृत्वाने मोठो होत असतो. डावखरे यांनी देखील किती वर्ष काम केले आहे, त्यातूनच ते आमदार आणि सभापती झाले. पालकमंत्री शिंदे हे देखील हे एक शाखा प्रमुख होते, पुढे नगरसेवक, सभागृह नेता, आमदार झाले. त्यानंतर मंत्री पालकमंत्री, विरोधी पक्ष नेता झाले एवढी सर्व पदे मागील २५ ते ३० वर्षे ते ठाणो शहरात काम करीत आहेत. कार्यकर्ता असाच घडत नसतो, सकाळी व्हिडीओ करायचा टिका करायची आणि सोडून द्यायची अशी टिकाही त्यांनी केली.
त्याचसोबत केवळ टीका करण्याशिवाय तुम्हा काय केले, या आव्हानाच्या गोष्टी तुम्ही आमच्या सारख्यांना सांगूनका अजूनही आमच्यातील शिवसैनिक जागा आहे. आम्ही कोणत्याही पदावर असलो तरी आमचे शिवसेनेचे जे पद आहे, तो शिवसैनिक असतो. घरातून उचलून नेन्याची धमकी आम्हाला देऊ नका आम्ही काय लहान मुल नाही, तुम्ही तुमच्या औकातीत रहा आणि निमुटपणे पक्षाचे काम करा, चांगली कामे असतील आम्ही सहकार्य करु परंतु अशी टीका, आव्हान देणार असाल तर आमच्या नादीसुद्धा लागू नका असा इशाराही राजन विचारे यांनी दिला होता.