पुणे – संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड(Pravin Gaikwad) आणि मनसे(MNS) यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. तेव्हा राज ठाकरेंनी(Raj Thackeray) जातीव्यवस्थेवरुन अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं.
प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर पुण्यातील मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे(Vasant More) म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रविण गायकवाड, असं सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
तर राज ठाकरे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात, रोखठोक बोलतात. योग्य ते योग्य, चूक ते चूक स्पष्ट भूमिका मांडतात. २१ व्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्य संदर्भात बोलतात. एकच जात माणुसकी, महाराष्ट्र धर्म, तरीही काही असंतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलायचं. आपण जर आपली पात्रता सोडून बोलला तर महाराष्ट्र सैनिक, राजदूत पात्रता सोडून जशास तसं छान उत्तरं देतील. राज ठाकरे नुसते बोलत नाहीत तर सत्य, वस्तूस्थिती आणि रोखठोक बोलतात. काम प्रचंड करतात. उगाच लोक कृष्णकुंजवर येऊन त्यांच्या अडचणी मांडत नाही. कारण प्रश्न अनेक असतील तर उत्तर राज ठाकरे आहेत अशा शब्दात मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी सुनावलं आहे.
प्रविण गायकवाड काय म्हणाले होते?
राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
'परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की ! असेही ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत आणि राजकीय स्वार्थातून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा मुद्दा हा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,' असं राज ठाकरे म्हणले होते.