रुद्रप्रयाग - गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये भाजपाच्या नेत्यांविरोधात लोकांच्या संतापाचा उद्रेक होत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता असाच प्रकार उत्तराखंडमध्ये घडला आहे. उत्तराखंडमध्ये देवस्थानम अॅक्टचा विरोध करत असलेल्या काही लोकांनी रुद्रप्रयाग येथील उखीमठामध्ये आज जोरदार गोंधळ घातला. यावेळी जमावाने भाजपा नेते पंकज भट यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. अखेरीस भट यांनी भिंतीवरून उडी घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेऊन जीव वाचवला.
देवस्थानम अॅक्टचा विरोध करत असलेल्या काही लोकांनी उखीमठात गोंधळ घातल्यानंतर भाजपा नेते पंकज भट्ट यांना घेरले आणि धक्काबुक्की करत मारहाण केली. अखेर जमावाच्या गराड्यातून कशीबशी वाट काढत पंकज कारमध्ये बसले. मात्र जमावाने त्यांच्या कारला पुढे जाऊ दिले नाही. सुरक्षारक्षकांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाला रोखणे त्यांना शक्त झाले नाही. पंकज यांनी कशीबशी गाडी पुढे काढली. पण पुढे रस्ता नसल्याने गाडी अडकली. अखेर पंकज यांनी कारमधून बाहेर पडत एका उंच भिंतीवरून उडी मारली आणि तिथे असलेल्या घरांचा आडोसा घेत ते जमावाच्या तावडीतून सुटले. मात्र यादरम्यान जमावाने सातत्याने त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांना शिविगाळ केली.
या घटनेचा व्हिडीओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने बनवला. तसेच तो सोशी मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंकज भट उखीमठ येथे देवस्थानम बोर्ड भंग करण्याच्या मागणीसाठी तीर्थपुरोहितांनी आयोजित केलेल्या सभेला पाठिंबा देण्यासाठी आले होते. मात्र भाजपा नेते पंकज भट यांना पाहून तीर्थपुरोहित संतप्त झाले.
पंकज भट्ट हे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे तीर्थपुरोहितांना याची माहिती मिळाल्यावर त्यांचा राग अनावर झाला. भाजपा नेत्याने रॅली तहसील गेटमध्ये जाऊ नये म्हणून तहसील गेटमध्ये आपली गाडी चुकीच्या पद्धतीने लावली होती, असा आरोप तीर्थपुरोहितांनी केला. तर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रा न झाल्याने तीर्थपुरोहित संतप्त असल्याचा दावा भट्ट यांनी केला.