नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय असहिष्णुतेचे सर्वात मोठे पीडित आहेत, असे मत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले आहे. कलाकारांसह अन्य काही लोकांनी भाजपला सत्तेतून हटविण्याचे आवाहन केले आहे, अशा काळात नक्वी यांनी हे विधान केले आहे, हे विशेष.पत्रकारांशी बोलताना नक्वी म्हणाले की, तथाकथित बुद्धिजीवी वर्गाने अमेरिका आणि युरोपीय संघाला मोदींविरुद्ध लिहिले होते. नक्वी यांनी असा आरोप केला की, काँग्रेसचे काही नेते पाकिस्तानात गेले होते. मोदींना पराभूत करण्यासाठी त्यांनी शेजारी देशांची मदत मागितली होती.नक्वी म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सांगितले होते की, राज्यघटना धोक्यात आहे. या लोकांनी दावा केला होता की, मोदी सरकारच्या नेतृत्वात देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे.या कटकारस्थानानंतरही मोदींवर लोकांचा विश्वास वाढतच आहे. या दुष्प्रचारानंतरही मोदी यांनी परिश्रम आणि चांगल्या कामातून देशात प्रगती केली आहे.
मोदी राजकीय असहिष्णुतेचे सर्वात मोठे पीडित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 5:26 AM