नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी ६ वाजता विस्तार होणार आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अद्यापही मंत्र्यांच्या नावाची यादी अधिकृतपणे घोषित करण्यात आली नाही. मात्र दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्या नेत्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होती अशांना दिल्लीत बोलावणं आलं होतं. नव्या मंत्रिमंडळात अनेक तरूणांना संधी देण्यात आली आहे.
बुधवारी सकाळपासून दिल्लीत घडामोडी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अनेक नेते पोहचत आहेत. सूत्रांनुसार कॅबिनेट विस्तारापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची संवाद साधणार आहेत. आतापर्यंत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, अजय भट्ट, कपिल पाटील, नारायण राणे, भारती पवार शांतनू ठाकूर, पशुपति पारस, मीनाक्षी लेखी, प्रीतम मुंडे, शोभा करांडलजे, अनुप्रिया पटेल, हिना गावित, अजय मिश्रा, भागवत कराड हे नेते पोहचले आहेत.
नव्या मंत्र्यांच्या समावेशासोबतच काही केंद्रीय राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढतीही मिळू शकते. अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला यांना कॅबिनेटपदी बढती मिळू शकते. मात्र या सर्व घडामोडीत महाराष्ट्रातील चर्चेत नसणाऱ्या एका नावाचा मंत्रिमंडळात समावेश होत असल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. हे नाव म्हणजे नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार.
डॉ. भारती पवार कोण आहेत?
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी, अल्पकाळातच त्यांनी संसदेत महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेत भाग घेऊन पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय मतदारसंघातील प्रश्नांसोबतच राज्यस्तरीय विषय त्यांनी संसदेत हाताळले आहेत. व्यवसायाने डॉक्टर तसेच आदिवासी असल्याने त्यांच्या मंत्रिपदामुळे आदिवासी समाजात चांगला संदेश जाण्याची पक्षाला अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी दिल्लीवारी करून पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेठी घेतल्या आहेत. सोमवारी बंगळुरू व मंगळवारी मुंबईत पवार यांनी भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या होत्या.
हिना गावित यांचाही समावेश
डॉ. हिना गावित यांचेही मंत्रिपदासाठी नाव चर्चेत असून, हिना गावित या दुसऱ्यांदा खासदार झाल्या असून, संसदेच्या कामांचा त्यांना अनुभव आहे. व्यवसायाने वकील तसेच राजकीय वारस असल्याने गावित यांच्याही नावाचीही चर्चा होत आहे. गावित यादेखील आदिवासी असल्यामुळे नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात पक्ष संघटनेसाठी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग होऊ शकतो असा पक्षाचा अंदाज आहे. हिना गावितही पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहचल्या आहेत.