- हरीश गुप्तानवी दिल्ली : ‘पद्म’ पुरस्कारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय संदेश दिला आहे. दिल्लीतील ‘ल्युटियन्स’मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना ‘पद्म’पुरस्काराने सन्मानित करण्याचा आधीच्या सरकारच्या प्रथेऐवजी समाजाच्या विविध क्षेत्रांत समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या मान्यवर व्यक्तींना ‘पद्म’ पुरस्कार देण्याचा नवीन पायंड्यासाठी पंतप्रधान मोदी यांना ओळखले जाते; परंतु, केंद्रातील सत्तेच्या ७व्या वर्षी २०२१ मध्ये मात्र त्यांनी सहापेक्षा अधिक राजकीय नेत्यांंना ‘पद्म’ पुरस्कारा देऊन त्यांनी मार्ग बदलल्याचे संकेत यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारातून मिळतात.भाजपचे दिवंगत नेते केशुभाई पटेल (गुजरात), लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते राम विलास पासवान (बिहार) आणि काँग्रेसचे दिवंगत नेते तरुण गोगोई (आसाम) यांना मरणोत्तर ‘पद्म’पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हरियाणाचे आणि अकाली दलाचे (बादल) नेते सरदार तरलोचन सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यातून पंतप्रधान मोदी मागच्या दरवाजाने अकाली दलाला पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणण्यासाठी किंवा अकाली दलाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने काम करीत असल्याचे संकेत मिळतात. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन (पद्मविभूषण), माजी केंद्रीयमंत्री बिजय चक्रवर्ती (पद्मश्री), गोव्यातील भाजप नेते आणि माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनाही पद्मश्री देण्यात आला आहे. हे पाहता मोदी पंजाब, आसाम आणि बिहारमध्ये आपले राजकीय पाठबळ भक्कम करू पाहत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी आपण सामूहिक नेते असल्याचे प्रतित केले आहे.
मोदी यांनी दिला ‘पद्म’ पुरस्कारातून राजकीय संदेश, निवडणूक होणाऱ्या राज्यांना सिंहाचा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 4:47 AM