मुंबई : यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा तयार केला आहे. त्यात भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास वगळून राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्तांचा पराक्रमा अधोरेखित करण्यात आला आहे. या निर्णयावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच घटकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर विरोधकांसह काँग्रेसने या निर्णयावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. 'मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे. त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ ची इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला', असे ट्विट करून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटद्वारे यूजीसीच्या या निर्णयावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ ची इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला. इतिहासाला धार्मिक व जातीयवादी दृष्टिकोनातून पाहणारे मोदी सरकार भारताचे कधीही न भरून येणारे नुकसान करत आहेत. शिक्षण क्षेत्राचे संघ विचारधारेतून राजकीय फायद्यासाठी विकृतीकरण नव्या पिढीला घातक आहे. काँग्रेसने देश घडवला, सहिष्णू वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. भाजपा देशाचा चेहरा बिघडवत आहे", असे सचिन सावंत म्हणाले.
याचबरोबर, "इतिहास हा धर्म, जाती, चांगल्या वाईटाचा नसतो. ती मानवीय प्रवासातील घटनांची नोंद असते. भारताचा प्रवास अभ्यासाचा विषय असावा. मुघल किंवा इतर परकीय शासक हे अत्याचारीच होते हे दाखवून विशिष्ट समाजाप्रती द्वेष निर्माण होऊन राजकीय फायदा घेणें हा मोदी सरकारचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा २१ व्या शतकातील वैज्ञानिक व प्रगतीशील दृष्टिकोन तयार व्हावा व राष्ट्रीय एकता मजबूत व्हावी हा उद्देश नाही. मानवता, करुणा व सद्भावना हे मनुष्याचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये षड्रिपूंचा त्याग हे जीवन ध्येय दर्शवले आहे. द्वेष, तिरस्काराने समाजाची प्रगती साधू शकत नाही", असे ट्विटद्वारे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी मोदी सरकारसोबतच आरएसएसचा देखील उल्लेख करत थेट ब्रिटिश काळातील काही घटनांचा संदर्भ जोडला आहे. "अत्याचाराचीच नोंद घ्यायची असेल तर मनुवादातून बहुजनांवर झालेले हजारो वर्षांचे अत्याचार सर्वात भयानक म्हणावे लागतील. एकलव्य, शंभूकापासून सुरु करुन बौद्ध स्तूप तोडली, त्यामागील मानसिकता ही अभ्यासावी लागेल. संघाचा मनुवाद, ब्रिटिशांशी संगनमत व देशविरोधी कारवायाही अभ्यासाव्या लागतील", असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.