नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील १-२ दिवसांत ही यादी अंतिम करण्यात येणार आहे. २ वर्षानंतर मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये होणारा विस्तार मोठा मानला जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील हा दुसरा विस्तार असेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, चांगले प्रदर्शन न करणाऱ्या मंत्र्यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. तर अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळ विस्तारात पाहायला मिळू शकतात. सध्या मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये २१ मंत्री आहेत. त्यासोबत ९ स्वतंत्र प्रभार आणि २३ राज्यमंत्री आहेत. या मंत्रिमंडळाची संख्या वाढण्याचे संकेत आहेत असं दिल्लीतील सूत्रांनी सांगितले आहे. दै.भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात (Modi Cabinet Expansion) सध्या ज्योतिरादित्य शिंदे(Jyotiraditya Scindia) यांच्या नावाची चर्चा आहे.
कोणत्या नव्या चेहऱ्यांचा समावेश असू शकतो?
ज्योतिरादित्य शिंदे, दिनेश त्रिवेदी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, वरूण गांधी, जामयांग शेरिंग नामग्यालसारख्या चेहऱ्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. तर २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह अन्य राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्यामुळे या राज्यांच्या समीकरणावर विशेष लक्ष दिलं जाईल असं विश्लेषक म्हणतात. उत्तर प्रदेशमधून आलेल्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना मोठं मंत्रालय देण्यात येऊ शकतं. जेणेकरून मंत्री थेट जनतेशी नाळ जोडतील.
सध्याच्या स्थितीत असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्याकडे एकाहून अधिक विभागाची जबाबदारी आहे. ज्यात प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, स्मृती ईरानी, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर, डॉ. हर्षवर्धन, हरदीप सिंह पुरी यांच्या नावाचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट विस्तारात यांच्याकडील खात्यांचा भार काढून घेतला जाऊ शकतो
या नावांचीही दिल्लीत चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, सुशील मोदी, महाराष्ट्रातील नारायण राणे, भूपेंद्र यादव आणि आणखी एक ज्येष्ठ नेता ज्यांच्याकडे बिहारसोबत गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. त्यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकतं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरूण गांधी, अनिल जैन, जफर इस्लाम, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.
२०१९ मध्ये मोदी सरकारच्या स्थापनेनंतर जदयूला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची ऑफर भाजपानं दिली होती. परंतु त्यावेळी केवळ एक मंत्रिपद जदयूला दिलं जात होतं. त्यामुळे जदयूने भाजपाची ऑफर नाकारली. आता जदयू २ वर्षानंतर भाजपा कॅबिनेटमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. मात्र जदयूमध्ये मंत्रिपदासाठी अधिक दावेदार आहेत. पण सरकारमध्ये १ किंवा २ पेक्षा अधिक मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे.