नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या आंध्र प्रदेशमध्ये निवडणूक दौऱ्यावर आहेत. विजयवाड्यात एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी गरीब कुटुंबांना 72 हजार रुपये देण्याच्या आश्वासनाचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, मी मोदी नाही, त्यामुळे मी खोटे बोलत नाही. त्यांनी तुम्हाला 15 लाख रुपये देतो असे सांगितले होते. पण ते आश्वासन खोटं होतं. त्यांचं सरकार आपल्या बँक अकाऊंटमध्ये 15 लाख रुपये जमा करू शकलेलं नाही. परंतु आमचं सरकार आल्यास देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देऊ, असं आश्वासन पुन्हा एकदा राहुल गांधींनी जनतेला दिलं आहे.जाहीरनाम्यात आम्ही मोठा निर्णय घेतला आहे. आम्हाला भारतातून कायमस्वरूपी गरिबी हटवायची आहे. यूपीएच्या विविध योजनांमुळे अनेक कुटुंब गरिबीतून बाहेर आली. परंतु 2014नंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बरबाद केलं, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
तर काही वेळापूर्वीच काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून पक्षात लोकसभा उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी करोडो रुपये मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी सदस्य पी. सुधाकर रेड्डी यांनी रविवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र राजीनाम्याच्या अगोदर पी. सुधाकर रेड्डी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात सुधाकर रेड्डी यांनी लिहलंय की, काँग्रेस पक्षाची विचारधारा, परंपरा आणि मूल्य दुर्देवाने आता पक्षात नाही. 2018 च्या तेलंगणा विधानसभा निवडणूक, एमएलसी निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षात तिकीट वाटपामध्ये प्रचंड प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली आहे. स्थानिक काँग्रेस प्रदेश नेतृत्त्वावर आक्षेप घेत सुधाकर रेड्डी यांनी पक्षात तिकीट वाटपात करोडे रुपये मागत असल्याचा धक्कादायक आरोप केला. काँग्रेस या राजकीय पक्षाचे झालेले बाजारीकरण मला पक्ष सोडण्याचा विचार करण्यासाठी प्रेरित करत आहे. नेतृत्त्वात बदल करण्यासाठी मी प्रयत्न केले मात्र माझे प्रयत्न अयशस्वी ठरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.