केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात एकीकडे मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली सीमेवर गेल्या महिनाभरापासून उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये टाकले आहेत. हे पैसे पंजाब, हरियाणाच्या आंदोलक शेतकऱ्यांनाही मिळालेले आहेत. यामुळे मोदी सरकारच शेतकरी आंदोलनाला फंडिंग करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बँक खात्यात पैसे आल्यानंतर पंजाबच्याच शेतकऱ्यांनी हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आंदोलन करण्यासाठी हा पैसा पाठविला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पैसा कोण पुरवते, असा सवाल भाजपाच्याच नेत्यांनी उपस्थित केला होता. यावर या शेतकऱ्यांनी केलेले हे आरोप या प्रश्नाचे उत्तर असल्याचे म्हटले जात आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना पैसे पाठवून मोदी सरकारने भेदभाव केलेला नाही. या योजनेतील आजचे पैसे हे पंजाबच्या शेतकऱ्यांनाही मिळाले आहेत. कृषी कायद्यांविरोधात याच राज्यातील बहुतांश शेतकरी आंदोलनात उतरले आहेत. यामुळे या पीएम किसान योजनेच्या हप्त्यावरून पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेले हो वक्तव्य धक्कादायक आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
पंतप्रधानांनी हा पैसा आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठविला आहे. पंजाबच्या सियालका गावात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये आले आहेत. या गावातील शेतकरी बलविंदर सिंह यांचे म्हणणे आहे की, सरकार आमच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. मात्र, तेच फंडिंग करत आहेत. जे पैसे मोदी यांनी आम्हाला पाठविले आहेत ते आम्ही आंदोलनासाठी दान करणार आहोत.
अन्य एका शेतकरी जसपाल सिंह यांनी सांगितले की, जे लोक आंदोलनासाठी फंडिंग कोण करते यावर प्रश्न विचारत आहेत, त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की पंजाबचे शेतकरी घराघरात जाऊन आंदोलनासाठी समर्थन मागत आहेत. लोक त्यांच्या इच्छाशक्तीनुसार 50 ते 5000 रुपये दान करत आहेत. या पैशांतून आवश्यक साहित्य खरेदी करून ते दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांना पाठविले जात आहे. आमची लढाई सरकारविरोधात आहे, या पैशांचा वापर आम्ही आमच्यासाठी करणार नाही. हे पैसे आम्ही आंदोलनासाठी देणार.