नवी दिल्ली - एकीकडे विरोधी पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मोदी आणि भाजपानेही या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये सरकारच्या पुढील तीन वर्षांसाठीच्या वाटचालीचा अजेंडा निश्चित केला जाणार आहे. (The Modi government will formulate an agenda for three years in the next three days, many big decisions will be taken)
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच काही मंत्रालयांची जबाबदारी बदलण्यात आली होती. आता मंत्र्यांची ही टीम पुढील आठवड्यात तीन दिवसांची बैठक आयोजित करणार आहे. मंगळवारी संध्याकाळी सुरू होणाऱ्या या बैठकीत पुढील तीन वर्षांतील वाटचालीवर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यादरम्यान सर्व मंत्रालयांच्य कामाचा आढावा घेतला जाईल. तसेच पुढील लक्ष्य निश्चित केले जाईल. याशिवाय नव्या मंत्र्यांना त्यांचे विभाग आणि मंत्रालयांसंदर्भात माहिती दिली जाईल.
गेल्या महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य, आयटी आणि पेट्रोलियमसह डझनभर मंत्रालयांमध्ये बदल केला होता. सरकारने पुढील काळात विविध राज्यांत होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांची निवड केली आहे. पुढच्या वर्षी देशातील सात राज्यात निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत मोदींची आणि पक्षाची घसरलेली लोकप्रियता सावरण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. २०१९ मध्ये सत्तेवर पुन्हा आल्यावर मोदी सरकारने कलम ३७० हटवण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.