मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने देशातील जनतेला संविधानाचे पावित्र्य राखण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला आहे. घटना अस्तित्वात आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांचा परिवार सोडता देशातील जनता घटनेचे पावित्र्य निष्ठेने सांभाळत आहे. सत्तेत आल्यापासून राज्यघटनेला पायदळी तुडवत कारभार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री, नेते व कार्यकर्त्यांना घटनेचे पावित्र्य राखण्याचा सल्ला द्यावा, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खा. हुसेन दलवाई यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना दलवाई म्हणाले की, घटनेच्या पावित्र्यासंदर्भात पंतप्रधानांचे वक्तव्य म्हणजे “लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडा पाषाण” अशा प्रकारचेच आहे. गेल्या सहा वर्षातील मोदी सरकारचा कारभार पाहता त्यांनी स्वतः आणि देशाच्या विविध राज्यातील भाजपाचे मुख्यमंत्री संविधानाला हरताळ फासून हुकुमशाही वृत्तीने सरकारे चालवत असल्याचे दिसून येते. कोणी काय खावे? कोणी कोणता पेहराव करावा? कोणी कोणावर प्रेम करावे? आणि कोणी कोणाशी लग्न करावे? याचे स्वातंत्र्य घटनेने लोकांना दिले आहे. तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. मात्र भाजपाचे नेते व विविध राज्यातील भाजपाची सरकारे लोकांच्या खासगी बाबीत नाक खुपसून दररोज घटनेला पायदळी तुडवून आहेत. त्यांचे कान मोदी पकडत नाहीत, त्यामुळे या सर्वांना त्यांचा मूक पाठिंबा आहे, असे दिसते.
घटनेच्या पावित्र्याच्या गप्पा मारायच्या आणि प्रत्यक्षात घटनेला सुरुंग लावायचा या स्वयंसेवक संघाच्या शिकवणीवर पंतप्रधानाचे वर्तन सुरु आहे ते आता तरी थांबवणार आहेत का? नरेंद्र मोदी यांना खरेचच घटनेच्या पावित्र्याची काळजी असती तर दररोज घटनाविरोधी वक्तव्ये आणि कृत्ये करणा-या आपल्या पक्षाची सरकारे व नेत्यांवर त्यांनी काही कारवाई केली असती. प्रत्यक्षात मोदी स्वतः ही घटनेचे पावित्र्य राखतात असे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दिसलेले नाही. त्यामुळे मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे, असा टोला दलवाई यांनी लगावला.